Advertisement

बिबट्याचा माग काढण्यासाठी येणार पुण्याचे विशेष श्वान पथक ?

प्रजापत्र | Monday, 30/11/2020
बातमी शेअर करा

आष्टी-बीड जिल्ह्यात कोरोनापेक्षा अधिक सध्या बिबट्याची दहशत पसरली असून आष्टी तालुक्यातील तिघांना बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले आहेत.या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सव्वाशे कर्मचारी आणि राज्यातील विशेष पथके तीन दिवसांपासून आष्टी तालुक्यात तळ ठोकून बसली असतानाही नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात यश न आल्याने आता पुण्याचे विशेष श्वान पथक आष्टी तालुक्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे.रविवारी या संदर्भात वन विभागाच्या वतीने मागणी करण्यात आली होती.त्यानुसार आज रात्री पर्यंत हे पथक आष्टीत दाखल होण्याची शक्यता आहे. 
                                     बीड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून बिबट्याने दहशत माजवली आहे. विशेषत: आष्टी तालुक्यात बिबट्याने आतापर्यंत तीन बळी घेतले आहेत. बिबट्याचा माग काढण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून प्रशिक्षीत वनरक्षकांची पथके बोलावण्यात आली आहेत. ही पथके बिबट्याचा शोध घेण्यासाठी जंगजंग पछाडत असली तरी बिबट्या मात्र या सर्वांना चकवा देत बेफाम सुटल्याचे चित्र आहे.सुरडी,किन्ही आणि नंतर पारगाव जोगेश्वरीमधील महिलेला बिबट्याने शिकार केल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली.सोमवारी (दि.३०) सकाळी वन विभागाची पथके आष्टी तालुक्यात सर्वत्र सर्च मोहीम राबवत आहेत.सुरडी,किन्ही,पांगुळगव्हाण,मंगरूळ आणि पारगाव जोगेश्वरीमध्ये सध्या वन कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कामाला लागले असून या परिसरामध्ये पिंजरे लावण्यात आले आहेत.आज रात्रीपर्यंत पुण्याचे विशेष श्वान पथक आष्टीत दाखल होण्याची शक्यता आहे. 

 

तलवार नदीत लावले जाळे 
बिबट्या शिकार केल्यानंतर नदी खोऱ्यामध्ये ग्रामस्थांना दिसले असल्याचे अनेकदा सांगण्यात आले आहे.त्या पार्श्वभूमीवर आष्टीच्या तलवार नदीत ७ ते ८ ठिकाणी मोठमोठी जाळे बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आली. 

सुरेखा बळेंवर अंत्यसंस्कार 
दरम्यान रविवारी रात्री सुरेखा बळे या रानात चप्पल विसरल्याने सायंकाळी सहा वाजता गेल्या होत्या.यावेळी अगोदरच रानात दाबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांना ठार मारले.सोमवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या पार्थिवावर जोगेश्वरी पारगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आ.सुरेश धस,आ बाळासाहेब आजबे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.सुरेखा बळे यांच्या पश्चात पती,एक मुलगा,मुलगी असा परिवार आहे.  

 

ग्रामस्थांनी ही घेतला वन विभागाच्या सर्च मोहिमेत सहभाग 
आष्टी तालुक्यातील बिबट्याची दहशत पाहता पारगाव जोगेश्वरी आणि इतर गावातील ग्रामस्थांनी ही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करत त्यांच्या मोहिमेत सहभाग घेतला.सध्या वन विभाग आणि गावकरी बिबट्याच्या शोधासाठी वणवण भटकत असल्याचे चित्र आहे.  

Advertisement

Advertisement