मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी आहे. ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झाले आहे. आज सकाळी 6 वाजता वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी 12 वाजता कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भालचंद्र कुलकर्णी यांनी आपल्या कारकीर्दीत 300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय साकारला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रेक्षकांच्या समोर आले होते.
हिंदी चित्रपटांतही साकारल्या भूमिका
कोल्हापुरात चित्रीकरण झालेल्या काही हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. रा. छत्रपती शाहू मालिकेसह अनेक टीव्ही अनेक मालिकेतही त्यांनी काम केले होते. अतिशय साधी राहणी असलेल्या कुलकर्णी यांनी चित्रपटात सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. सहाय्यक भूमिकेसाठी त्यांना ओळखले जात होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर होते.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
भालचंद्र कुलकर्णी यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ते अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून ही काम केले होते.
भालचंद्र कुलकर्णी यांनी मर्दानी (1983), मासूम (1993), झुंज तुझी माझी (1992), हळद रुसली कुंकू हसलं (1991), माहेरची साडी (1991) या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. नवरा नको गं बाई, सोंगाड्या, पिंजरा, थरथराट, मुंबईचा जावई, खतरनाक या चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.