मुंबई - टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत 2-1 ने पराभव केला. त्यानंतर आजपासून (17 मार्च) उभय संघातील 3 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र कडकडीत असूनही क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र दुसऱ्या बाजूला स्टार क्रिकेटरने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. माजी कर्णधार राहिलेल्या या खेळाडूने क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचा माजी कर्णधार राहिलेल्या टीम पेन याने शुक्रवारी निवृत्ती जाहीर केली आहे. शेफील्ड शील्ड स्पर्धेत तस्मानिया विरुद्ध क्वीसलँड यांच्यात प्रथम श्रेणी सामना खेळवण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिला. यानंतर पेन याने प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. यानतंर पेन याला खेळाडूंनी गॉर्ड ऑफ ऑनर दिला.
टीम पेन याने आपल्या कसोटी कारकीर्दीत 35 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. या दरम्यान पेन याने 2018 ते 2021 या दरम्यान एकूण 23 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्वही केलं. मात्र दक्षिण आफ्रिका विरुद्ध 2018 साली चेंडूसह छेडछाड केल्याने स्टीव्ह स्मिथ याला कर्णधारपद सोडावं लागलं होतं. त्यानंतर पेन याला कर्णधार करण्यात आलं. यासह पेन ऑस्ट्रेलियाचा 46 वा कर्णधार ठरला. मात्र 2021 मध्ये पेनने एका वादात अडकल्यानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. तस्मानियाच्या एका माजी कर्णधाराला वादग्रस्त मेसेज करण्याचा वाद वाढला होता. त्यानंतर पेन याने हा निर्णय घेतला होता.
टीम पेन याने 2010 साली पाकिस्तान विरुद्ध क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केलं होतं. टीमच्या या संपूर्ण कसोटी कारकीर्दीत त्याने 32.63 च्या सरासरीने धावा केल्या. पेनचा 92 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. शिवाय पेनने 35 वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं.
प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द
पेन याने आपल्या 154 प्रथम श्रेणी सामने खेळला. यात त्याने 6 हजार 490 धावा केल्या. या दरम्यान त्याने 3 शतकं आणि 35 अर्धशतकं ठोकली. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 8 शतकांच्या मदतीने 3 हजार 971 धावा केल्या.