Advertisement

राज्यावर अवकाळीचे संकट

प्रजापत्र | Wednesday, 15/03/2023
बातमी शेअर करा

मुंबई - राज्यात आजपासून १८ मार्चपर्यंत हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला असून राज्यात येणारे तीन दिवसात अनेक जिह्यात गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे.  मराठवाडा विदर्भ, दक्षिण कोकणात वीजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या सरी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून हलक्या सरीही कोसळत आहेत. संपूर्ण मराठवाड्यात असेच वातावरण आहे. मंगळवारीदेखील नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने कांदा व द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे.

 

या जिल्ह्यांमध्ये अधिक पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात अधिक पावसाची शक्यता आहे.

 

उद्या 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

उद्या 16 मार्चरोजी गुरुवारी राज्यात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

 

आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे अवकाळी पाऊस

देशाच्या मध्यवर्ती भूभागात पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा हवेच्या कमी दाबाचा आस व पूर्वेकडून पश्चिमेकडे तसेच बंगालचा उपसागर व आग्नेयेकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या मिश्रणातून हा अवकाळी पाऊस पडत असल्याची माहिती हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

Advertisement

Advertisement