मुंबई - जुन्या पेन्शनबाबत आजची बैठक निष्फळ ठरल्याने राज्यातले कर्मचारी आक्रमक झालेत. त्यामुळे एकच मिशन-जुनी पेन्शनचा नारा देत तब्बल 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत.
संपात या संघटना...
राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांतील कर्मचारी संपावर जाणार आहेत. या आंदोलनात राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, महाराष्ट्र शिक्षक सेना, ग्रेटर मुंबई शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, राज्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघ या संघटना सहभागी होणार आहेत.
सेवा कोलमडणार...
जुन्या पेन्शनची मागणी करत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महापालिका आणि नगर परिषदांमधील कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याची घोषणा केलीय. त्यामुळे या सेवा कोलमडणार आहेत. हे आंदोलन कधी पर्यंत चालणार, याचेही काही खरे नाही. त्यामुळे ऐन विधिमंडळ अधिवेशनात एकीकडे अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा लाँग मार्च आणि दुसरीकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.