Advertisement

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती?

प्रजापत्र | Monday, 13/03/2023
बातमी शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत मोठी चूक समोर आली आहे. राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. पण, त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचं पत्र १० मार्चला निघालं आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

विधानसभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, “विधानपरिषदेच्या गटनेतेपदासाठी एकनाथ खडसे यांचं नाव सुचवलं आहे. पण, १० मार्चला एक पत्रक निघालं आहे. त्यात विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद गटनेते प्रतोद पद रिक्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदावर एकनाथ शिंदे यांची आणि अनिकेत तटकरे यांची प्रतोद म्हणून उपसभापतींनी नियुक्ती केली आहे.”

“ही चूक अजूनही विधिमंडळाच्या वेबसाईटवर आहे. मुख्यमंत्र्यांनी तर देशाचे पंतप्रधानाच बदलले आहेत. देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू आहेत, असं जाहीर केलं आहे. त्यामुळे विधिमंडळाचं गटनेते पद धोक्यात आल्यासारखं दिसत आहे. नागालँडमध्ये मुख्यमंत्री रिओ हे सर्व पक्षांचा पाठिंबा घेत आहेत. ही नवीन पद्धत एकनाथ शिंदेंनी सुरु केली आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत,” अशी मिश्कील टिप्पणी जयंत पाटील यांनी केली आहे.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं, “जयंत पाटील यांनी दिलेली माहिती विधानपरिषदेच्या कामाकाजाची दिसत आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या कामकाजाबद्दल विधानसभेच्या सभागृहात चर्चा करता येणार नाही. पण, विधिमंडळाचा उल्लेख केला असल्याने याविषयी सखोल माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू,” असे आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिलं.

Advertisement

Advertisement