Advertisement

ऑस्कर'मध्ये पहिल्यांदाच मिळाली 3 नॉमिनेशन

प्रजापत्र | Sunday, 12/03/2023
बातमी शेअर करा

'ऑस्कर 2023' (Oscars 2023) हा पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास आहे. 95 व्या अकादमी पुरस्कार (95th Academy Awards) सोहळ्यात भारताच्या तीन कलाकृतींना नामांकने मिळाली आहेत. यात एसएस राजामौलीच्या 'आरआरआर' (RRR) या सुपरहिट सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला 'ओरिजनल सॉन्ग' या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं आहे. तसेच 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाला 'डॉक्टुमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. तसेच 'द एलिफेंट व्हिस्परर्स' या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं आहे. 

 

 

नामांकन व्यतिरिक्त 'ऑस्कर 2023'च्या (Oscars 2023) प्रेझेंटरच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) समावेश झाला आहे. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणाऱ्या 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. कलाविश्व आणि सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. दिग्गज कलाकारांपासून ते बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान आहे. 

 

 

'आरआरआर' - नाटू नाटू (Naatu Naatu)

'ऑस्कर 2023' या पुरस्कार सोहळ्यातील भारतीयांचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' हे गाणं. यंदाच्या ऑस्करमध्ये 'नाटू नाटू' या गाण्यावर हॉलिवूडची डान्सर लॉरेन गॉटलिब (Lauren Gottlieb) थिरकणार आहे. हे तेलुगू भाषेतील गाणं एमएम कीरावनी यांनी संगीतबद्ध केलं आहे. चंद्रबोस यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर राहुल सिप्तिगुंज आणि काल भैरवने हे गाणं गायलं आहे.  'नाटू नाटू' या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात (Golden Globe Awards 2023) सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉन्ग मोशन पिक्चर या कॅटेगरीमध्ये पुरस्कार पटकावला आहे. 

 

 

ऑल दॅट ब्रीथ्स (All That Breathes)

शौनर सेनच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाला 'ऑस्कर 2023'मध्ये 'डॉक्टुमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. दिल्लीत राहणाऱ्या मोहम्मद सौद आणि नदीम शहजाद या दोन भावंडांची कथा या माहितीपटात दाखवण्यात आली आहे. दोन भावडांनी जखमी पक्ष्यांना, गरुंडांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपलं जीवन कसं समर्पित केलं हे या माहितीपटात दाखवण्यात आले आहे. 'ऑल दॅट ब्रीथ्स'सह 'ऑल द ब्यूटी अॅन्ड द ब्लडशेड', 'फायर ऑफ लव्ह', 'अ हाउस मेड ऑफ स्प्लिंटर्स' आणि 'नवलनी' या माहितीपटांनादेखील 'ऑस्कर 2023'मध्ये 'डॉक्टुमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे.

 

 

द एलिफंट व्हिस्परर्स (The Elephant Whisperers)

'द एलिफंट व्हिस्परर्स' हा नेटफ्लिक्सवरचा एक माहितीपट आहे. या माहितीपटाला 'ऑस्कर 2023'मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं आहे. या माहितीपटात तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्न प्रकल्पातील एका कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तामिळनाडूतील एक कुटुंब बेबंद हत्तींना दत्तक घेतं आणि त्यांचं कसं संगोपन करतं यावर बेतलेला हा माहितीपट आहे. गुनीत मोगाने या माहितीपटाची निर्मिती केली असून कार्तिकी गोन्साल्विसने या माहितीपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  'द एलिफंट व्हिस्परर्स' या माहितीपटासह 'हॉलआउट', 'हाउ डू यू मेजर अ इअर', 'द मार्था मिचेल इफेक्ट', 'स्ट्रेंजर ॲट द गेट' या माहितीपटांचादेखील समावेश आहे. 

Advertisement

Advertisement