प्रवीण पोकळे
आष्टी - कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेला आठवडी बाजार उद्यापासून पुन्हा सुरू होत आहे.
जनावरांमधील लंपी रोगामुळे जिल्हा प्रशासनाने जनावरांचे आठवडे बाजार बंद केले होते.गाय,म्हैस,बैल आणि शेळ्यांची खरेदी विक्री बंद झाली होती.कडा येथे दर रविवारी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भरणारा पशूबाजार देखील बंद झाला होता.मात्र आता लंपी रोगावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून लसीकरण झालेले असल्याने जनावरांचे बाजार पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत होती.
जिल्हा प्रशासनाने लसीकरण केलेली जनावरे विक्रीस आणण्याच्या अटीवर या बाजारांना पुन्हा भरण्यास परवानगी दिली आहे.त्यामुळे कडा येथील जनावरांचा आठवडे बाजार देखील या रविवारपासून पूर्वत भरणार आहे.शेतकऱ्यांनी आपली जनावरे खरेदी विक्रीसाठी या बाजारात आणण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हनुमंत गळगटे यांनी केले आहे.