बीड - बाजारात कांद्याचे भाव कोसळल्याने काबाडकष्ट करून आणि मोठा खर्च करून शेतात लागवड केलेल्या कांद्याचे काय करायचे, एक-दोन रुपये भाव मिळत असल्याने केलेला खर्चही निघत नसल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत हवालदिल झालेल्या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील बोरखेड येथे उघडकीस आली आहे.
संभाजी अर्जून अष्टेकर (वय 23, रा.बोरखेड, ता.बीड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या कुटुंबात 5 एक्कर जमीन असून त्यात त्यांनी दीड-दोन एक्कर मध्ये कांदा लागवड केलेली आहे. दुसऱ्याची काही जमीनही त्यांनी वाट्याने केलेली असून त्या जमिनीतही कांदा लागवड केलेली आहे. संभाजी चे आई-वडिल वृद्ध असून भाऊ भोळसर तर विधवा बहीण त्यांच्याकडेच वास्तव्यास असते. यामुळे संभाजीवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्याने प्रसंगी कर्ज काढून उत्पन्नाच्या आशेवर शेतीत खर्च केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, अतिवृष्टीने झालेले नुकसान आणि कांद्याचे भाव कोसळल्याने लोकांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत मंगळवार (दि.7) रोजी मध्यरात्री दरम्यान त्याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब बुधवारी सकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.