बीड - रात्रीच्या गस्त पेट्रोलिंगच्या वेळी एका बिअरबार समोर काहीजण तरूणाला मारहाण करत असल्याचे पाहिल्यानंतर मारहाण करू नका असे विचारताच तिघांनी दोन पोलीस कर्मचार्यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना जिरेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी तिघांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 353 सह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी कृष्णा उत्तमराव बडे आणि अनिल घाटमाळ हे पोलीस वाहन क्रमांक एम.एच.23.ए.ए.0062 मधुन दि.2 मार्च रोजी रात्री उशिरा गस्त पेट्रोलिंगसाठी गेले होते. जिरेवाडी जालना रोडवरील एका बिअरबारसमोर काहीजण साहेबराव तुलसीराम सावते (रा.गयानगर बीड) याला संगनमत करून मारहाण करत असल्याचे दिसले. त्यावेळी पोलीसांनी तुम्ही त्याला मारहाण कशाला करता ? तुमची काही तक्रार असेल तर पोलीस ठाण्याला द्या असे सांगितले. त्यामुळे आरोपीतांनी पोलीस कर्मचारी बडे आणि घाटमाळ यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून धक्काबुक्की करत मारहाण केली. त्याचबरोबर शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. या प्रकरणी पोलीस कर्मचारी बडे यांच्या फिर्यादीवरून सुनिल मोहिते, शुभम सुनिल मोहिते व अन्य एक यांच्याविरूध्द बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 353, 332, 323, 504, 506 भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सपोनि रणखांब हे करीत आहेत.
बातमी शेअर करा