बीड - इयत्ता दहावी परिक्षेचा पेपर देवून घरी येण्यासाठी निघालेल्या विद्यार्थीनीचा परिक्षाकेंद्राच्या आवारात एका २१ वर्षीय नराधमाने तिचा हात वाईट हेतूने धरुन विनभंग केल्याची संतापजनक घटना बीडध्ये घडली. याप्रकरणी त्या नराधम आरोपीच्या विरोधात पिडीत विद्यार्थीनीच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत अवघ्या काही तासात नराधमाला जेरबंद केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या इयत्ता दहावी बोर्डाच्या परिक्षा होत आहे. बीड शहरातील एक विद्यार्थीनी परिक्षा देण्यासाठी परिक्षा केंद्रावर आली होती. त्या विद्यार्थीनीच्या घराशेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय नराधम तिच्या गेल्या पाच वर्षापासून पाठलाग करुन तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता. परंतू त्याच्या भितीपोटी त्या मुलीने याबद्दल काधीही कोणाला ही काहीएक सांगितले नाही. परंतू गुरुवारी परिक्षा देण्यासाठी ती आपल्या आईसमवेत परिक्षा केंद्रावर आली. परिक्षेचा पेपर संपल्यानंतर ती परिक्षा केंद्राच्या बाहेर येत असतांना तो नराधम आरोपी हा तिच्या जवळ आला. तसेच तिचा वाईट हेतून हाताला धरुन म्हणाला की, तू माझ्या सोबत चल आपण तुझ्या घरी जावू आणि तुझ्या आई वडिलांना आपले लग्न करुन द्या असे म्हणून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन नराधमाने तिचा विनभंग केला. दरम्यान त्या विद्यार्थीनीने त्या नराधमाचा हात झटकला. मात्र तो तिच्या बरोबर चालत राहिला. मात्र परिक्षा केंद्राच्या गेट समोरुन त्या मुलीची आई तिला दिसली असता त्या मुलीने आपल्या सोबत झालेला प्रकार तिने आईला सांगितला. त्याचवेळी तिच्या आईने याचा जाब त्या नराधम तरुणाला विचारला असता त्याने मुलीच्या आईला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन शुक्रवारी (दि. ३) बीड शहर पोलिस ठाण्यात नराधम आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान याप्रकरणाची बीड शहर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत अवघ्या काही तासातच डीबी पथकाने आरोपीला जेरबंद करुन पुढील तपासाठी पिंक पथकाच्या त्याला स्वाधिन करण्यात आले आहे.