Advertisement

जिल्हा रुग्णालयात आता आधुनिक बेरा मशीनने होणार कर्णबधिरतेची तपासणी

प्रजापत्र | Friday, 03/03/2023
बातमी शेअर करा

बीड दि. ३ (प्रतिनिधी ) :  कर्णबधिरतेची तपासणी करण्यासाठी आता अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नसून कर्णबधिरतेच्या तपासणीसाठी आवश्यक असलेली आधुनिक बेरा मशीन जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या उपस्थितीत या तपासणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

 

कर्णबधिर असणाऱ्या रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑडिओमेट्री आणि बेरा मशीनद्वारे तपासणी करुनच त्यांची श्रवणशक्ती किती प्रमाणात कमी झाली आहे हे तपासून दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाते. शिवाय, वयानुसार कमी ऐकू येणाऱ्यांनाही तपासणी करुन कोणत्या क्षमतेचे श्रवणयंत्र आवश्यक आहे हे सूचवले जाते. बीड जिल्हा रुग्णालयात यापूर्वी केवळ ऑडिओमेट्री ही एकच मशिन तपासणीसाठी  उपलब्ध होती. त्यामुळे कर्णबधीरतेचे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बोर्ड रुग्णाला दिव्यंगत्वाच्या प्रमाणत्रासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवले जात होते. यामुळे रुग्णाचा वेळ आणि पैसा खर्च होत होता. त्यामुळे ही तपासणीची सुविधा बीड जिल्हा रुग्णालयातच सुरु व्हावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे हे प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. अखेर, शासनाकडून बेरा मशीनला परवानगी मिळून ती उपलब्ध करुन दिली गेली.शुक्रवारी जागतिक श्रवणदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या हस्ते या कक्षाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शहाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. राम आव्हाड, ऑडिओलॉजिस्ट अंजली तांबट, मेट्रन रमा गिरी, तंत्रज्ञ विलास घुले यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
 

Advertisement

Advertisement