Advertisement

बिबट्याचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

प्रजापत्र | Friday, 27/11/2020
बातमी शेअर करा

सव्वाशे कर्मचारी,चार पथके आणि तीन पिंजरे तैनात 

प्रवीण पोकळे  
आष्टी-तालुक्यात बिबट्याची दहशत मागील चार दिवसांपासून चांगलीच वाढली असून शुक्रवारी (दि.२७) या बिबट्याने एका दहा वर्षीय मुलाची शिकार केल्याची घटना समोर आली.आष्टी तालुक्यातील किन्ही गावातील या प्रकारामुळे एकच खळबळ उडाल्यानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वन विभागाचे कर्मचारी बबन गुंजाळ यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.सुदैवाने यात गुंजाळ यांना कुठलीही दुखापत झाली नसून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सव्वाशे कर्मचारी,चार पथके आणि तीन पिंजरे किन्ही परिसरात तैनात आहेत. 


                    शुक्रवारी (दि.२७) दुपारी स्वराज सुनील भापकर (वय-१०) हा मुलगा आपल्या काका कृष्णा हिंगे यांच्यासोबत शेतात गेला होता.यावेळी हिंगे हे तुरीला पाणी देण्यासाठी मोटर सुरु करण्यास गेले.त्यावेळी स्वराज हा त्यांच्यासोबत गेला. मात्र तिथे अगोदरच दबा धरून बसलेल्या बिबट्याने स्वराजवर झडप मारली.यावेळी त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला मात्र काका त्याला बिबट्याच्या जबड्यातून वाचवू शकले नाहीत. स्वराजला शेतातून फरफटत घेऊन जात असताना कृष्णा हिंगे यांनी ग्रामस्थांना फोन करून घटनेची माहिती देत शेतात मदतीला येण्याचे आवाहन केले.यावेळी ग्रामस्थ शेतात जमल्यानंतर वन विभागाला याची माहिती देण्यात आली.दरम्यान शेतापासून काही अंतरावर स्वराजचा मृतदेह आढळून आला होता.बिबट्याने स्वराजचा चेहरा विद्रुप केला असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सव्वाशे कर्मचारी,चार पथके आणि तीन पिंजरे किन्ही परिसरात लावण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली. 

 

अमरावतीचे विशेष पथक आष्टीत 
नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सध्या चार पथके किन्ही आणि सुरडी परिसरात सक्रिय असून या बिबट्याला पकडण्यासाठी अमरावतीचे विशेष पथक आष्टीला येत असल्याची माहिती आहे.हे पथक राज्यातील सर्वात उत्कृष्ट पथक असून या पथकाने आतापर्यंत अनेक हिंस्त्र प्राण्यांना पकडले आहे.आज रात्रीपर्यंत हे पथक आष्टीत दाखल होणार आहे. 

 
वन विभागाचे बबन गुंजाळ थोडक्यात बचावले 
दरम्यान या बिबट्याचा हल्ल्यात आतापर्यंत दोघांना प्राण गमवावा लागला असून वन विभागाचे कर्मचारी बबन गुंजाळ यांच्यावर या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी गुंजाळ यांनी घाबरून न जाता त्याला काठीने मारहाण केल्याने तो किन्हीमधून फरार झाला,आणि गुंजाळ हे बिबटयाचा शिकारापासून बालंबाल बचावले. 

 

लोकप्रतिनिधींची घटनास्थळी भेट 


स्वराज भापकरला बिबट्याने शिकार केल्यानंतर आ.सुरेश धस आ.बाळासाहेब आजबे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.तर खा.प्रीतम मुंडे यांनी ही आष्टी ग्रामीण रुग्णालयात स्वराज भापकरच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला. 

 

बीड सांगवीचा दऱ्यात बिबट्याचा मुक्काम ?


 

दरम्यान वन विभागाच्या मते हा बिबट्या बीड सांगावीच्या दऱ्यात मुक्कामाला असून तो शिकार करण्याच्या वेळी बाहेर पडतो आणि शिकार झाली की परत त्या दऱ्यात जातो असा अंदाज असून त्या ठिकाणी एक पिंजरा त्याला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आला आहे. 
 

Advertisement

Advertisement