Advertisement

माजलगावच्या शेतकऱ्याची कन्या सोनाली मात्रे MPSC परीक्षेत राज्यात प्रथम

प्रजापत्र | Wednesday, 01/03/2023
बातमी शेअर करा

निलेश गरुड
माजलगाव-नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यात महिला उमेदवारामधून प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक येण्याचा मान  माजलगावची कन्या सोनाली अर्जुन मात्रे हिला मिळाला आहे.शेतकऱ्याच्या 
लेकीने घेतलेली भरारी माजलगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
    आयोगाने ४०५ पदांसाठी ७, ८ व ९ मे २०२२ रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. मंगळवारी (दि.२८) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामधे प्रमोद चौगुले यांनी ६३३ गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावला तर शुभम पाटीलला ६१६ गुण मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. महिलामध्ये सोनाली मात्रे पहिली आहे, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे. सोनाली ही माजलगाव तालुक्यातील ईरला मजरा येथील रहिवाशी असून शेतकरी अर्जुन मात्रे यांची कन्या आहे. सोनालीच्या रूपाने राज्यात MPSC परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह एकूण २० पदांच्या ४०५ जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता ३ मार्च २०२३ ते १० मार्च २०२३ या कालावधीत वेब लिंक उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

 

मुलीचा अभिमान 
माझ्या मुलीच्या यशाने मी भारावून गेलो आहे.लेकीन माझं स्वप्न पूर्ण केलं याचा खूप आनंद आहे.शेतात कष्ट करताना लेकीने घेतलेली भरारी माझ्यासाठी आनंददायी आहे.सातत्य,परिश्रम आणि चिकाटी याच्या बळावर तिने हे यश संपादन केले.   
अर्जुन मात्रे.  

Advertisement

Advertisement