Advertisement

जिल्हा बँकेच्या तिजोरीत खडखडाट ?

प्रजापत्र | Wednesday, 01/03/2023
बातमी शेअर करा

बीड दि. २८ (प्रतिनिधी ) : मागच्या काही वर्षात पूर्वपदावर येऊ पाहत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिजोरीत पुन्हा एकदा खडखडाट जाणवू लागला असल्याचे चित्र आहे. बँकेच्या वेगवेगळ्या  शाखांमधून ग्राहकांना वेळेवर पैसे मिळत नसून, शाखांमधून अधिकारी रोकड नसल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे बँकेने शेतकऱ्यांना दिलेले एटीएम मागच्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे आपल्या हक्काच्या पैशांसाठी ग्राहकांना, विशेषतः शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

 

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आजही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बँक आहे. या बँकेत बहुतांश खातेदार हे शेतकरी आहेत. मात्र मागच्या काही दिवसांपासून जिल्हा बँकेच्या बहुतांश शाखांमध्ये रोकड टंचाई जाणवत आहे.बँकेने शतकऱ्यांना शाखेपर्यंत जाण्याची वेळ येऊ नये म्हणून शेतकऱ्यांना वाटले होते , मात्र मागच्या काही दिवसांपासून हे एटीएम  बंद आहेत. ही तांत्रिक अडचण असल्याचे बँकेचे अधिकारी सांगत असले तरी ही अडचण कधी दूर होणार याचे उत्तर मात्र दिले जात नाही. दुसरीकडे शेतकरी प्रत्यक्ष शाखांमध्ये जाऊन आपली रक्कम मागतात, त्यावेळी त्यांना आज नाही उद्या या , असे सांगितले जात आहे. दिवसातून अनेकांना रोकड नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जिल्हा बँकेचे ग्राहक मात्र अडचणीत आले आहेत. जिल्हा बँकेच्या तिजोरीत पुन्हा खडखडाट झाल्याचे चित्र सामान्यांना अस्वस्थ करणारे आहे.

 

 

एटीएमनेच केला गोंधळ ?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा बँकेला निधीच्या तारलतेची समस्या मोठ्याप्रमाणावर जाणवू लागली आहे. बाणेकने शेतकऱ्यांना एटीएम दिले होते , यात अनेक शेतकऱ्यांनी अगदी शेवटचे पन्नास रुपये देखील खात्यातून काढून घेतले. बँकेतून व्यवहार झाल्यास किमान १ हजार रुपये मिनिमम बॅलेन्स म्हणून ठेवले जातात , मात्र अनेकांनी तेच ठेवले नाही , त्यामुळे किमान २० कोटींचा फटका बँकेला बसल्याचे सांगितले जाते. तसेच एटीएमवरील व्यवहारासाठी ऍक्सिस बँक जिल्हा बँकेला प्रक्रिया शुल्क आकारते , मात्र बँक ते शेतकऱ्यांना आकारत नाही, यामुळेही जिल्हा बँकेला फटका बसला आहे.

 

 

ठेवी मोडून पगार करण्याची वेळ
मागच्या काही महिन्यांपासून जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचे देखील वांदे झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच शासनाकडे असलेल्या ठेवी मोडून कर्मचाऱ्यांचे काही म्हणायचे पगार करण्यात आले आहेत.

 

Advertisement

Advertisement