Advertisement

आता रेशनच्या ऐवजी मिळणार काय?

प्रजापत्र | Tuesday, 28/02/2023
बातमी शेअर करा

बीड दि.28 (प्रतिनिधी): औरंगाबाद आणि अमरावती महसूल विभागातील बीडसह चौदा (14) शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमधील एपीएल शेतकर्‍यांसाठी लागू असलेली धान्य योजना बंद झाल्यानंतर आता या शेतकर्‍यांना रेशनवरील धान्यांऐवजी धान्यासाठी रोख अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी या चौदा जिल्ह्यातील एपीएल कार्ड धारक शेतकर्‍यांना प्रतिमानसी, प्रतिमाह 150 रुपये दिले जाणार आहेत.

 

राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्यानंतर बीडसह 14 आत्महत्या प्रवण जिल्ह्यांमधील एपीएल कार्ड धारक शेतकर्‍यांसाठी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने धान्य देण्यात येत होते मात्र या धान्याची खरेदी करण्यासाठी शासनाला जास्त रक्कम मोजावी लागत होती. 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ शेतकर्‍यांना देण्यासाठी शासनाला त्याच गव्हाची खरेदी 22 रुपये किलोने तर तांदळाची खरेदी 23 रुपये किलोने करावी लागत होती. त्यातच अन्न महामंडळाने आता या योजनेअंतर्गत गहू आणि तांदूळ उपलब्ध करून द्यायला मागच्या वर्षीच नकार दिला होता.त्यामुळे मागच्या तीन चार महिन्यात या योजनेला घरघर लागली होती.

 

या पार्श्‍वभूमीवर आता या चौदा जिल्ह्यातील केशरी कार्ड असणार्‍या शेतकरी कुटुंबांना रेशनवरील धान्या ऐवजी धान्य खरेदीसाठी थेट रोख स्वरुपात अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी शेतकरी कुटुंबातील रेशन कार्डवरील प्रत्येक व्यक्तीला दरमहा 150 रुपये दिले जाणार आहेत. हा निधी लाभार्थ्यांना थेट वितरण पद्धतीने दिला जाणार असून त्यासाठी आता रेशन कार्डधारकांनी आपला बँक खातेक्रमांक पुरवठा विभागात द्यावा लागणार आहे. 

 

Advertisement

Advertisement