बीड दि.२७ (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत जलजीवन अभियानात मोठ्या प्रमाणावर गैरकारभार झाला आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या गैरकारभारात सहभागी असून त्यांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे पाठबळ असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस आता आयुक्तांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे,बीड जिल्ह्यात 'जलजीवन 'मिशनच्या अंमलबजावणीबाबत तक्रारी मोठ्याप्रमाणावर वाढल्या असून आता आयुक्तालयात देखील तक्रारींचा पाऊस पडत आहे.मात्र विभागीय आयुक्त अनेक प्रकरणात दखल घ्यायला तयार नाहीत.विशेष म्हणजे चौकशी समितीने अनेक अनियमिततांवर बोट ठेवले मात्र त्यातील कारवाई प्रलंबित असतानाच आता नव्याने देखील तक्रारी वाढत आहेत. जिल्हा पातळीवर अनेक तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने आणि मर्जीतील गुत्तेदाराना अभय मिळत असल्याने बीडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने 'जल धडक' मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते.आज अनेक प्रकरणात सुनील केंद्रेकर स्वतः सीईओ अजित पवार यांची पाठराखण करीत असल्याने या योजनेतील शेकडो त्रुटी कायम आहेत.उद्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरकारभार देखील समोर येणार असून विभागीय आयुक्त याची दखल घेत नसल्याने आता त्यांच्या कार्यालयासमोर मार्च महिनाअखेर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे बाळा बांगर यांनी म्हटले.दरम्यान राष्ट्रवादीच्या या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.