बीड - महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहचणे शक्य नसल्यामुळे महिलांना त्यांच्या तक्रारी बाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्यासाठी "महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमाव्दारे दि. 1 मार्च 2023 बुधवार रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात महाराष्ट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये जनसुनावणी घेण्यात येणार आहे. यावेळी आयोगाच्या सदस्या ॲङ संगिता चव्हाण यांची प्रमुख् उपस्थिती राहणार आहे.
बीड जिल्ह्यातील तक्रारदार पिडीत महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, पिडित महिला कोणतीही पूर्व सूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपल्या लेखी समस्या आयोगापुढे मांडता येतील.
तसेच बीड जिल्हयातील पोलीस स्टेशनच्या आवारातील महिला सहाय्य कक्ष, समुपदेशन केंद्र, भरोसा सेल, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालयातील औरंगाबाद विभागातील बीड जिल्ह्याच्या तक्रारी आयोगाकडे ठेवण्यात येणार आहेत. जिल्हयातील जास्तीत जास्त तक्रारदार, पिडित महिलांनी आपल्या समस्या जनसुनावणीसाठी मांडाव्यात असे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, आर.आर. तडवी बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.