आज जी परिस्थिती भाजपाने शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, उद्या ही परिस्थिती ते देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आताच जर यांचा सामना केला गेला नाही, तर कदाचित आगामी २०२४ ची निवडणूक ठरू शकेल. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरू होऊ शकतो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे. जिल्हा प्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना भवन येथे झालेल्या पत्राकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिंदे गटाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव चोरलं आहे. हा पूर्वनियोजत कट होता. त्यांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी ते ठाकरे हे नाव नाही चोरू शकत. मी मॉं आणि बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलो, हे माझं भाग्य आहे. हे भाग्य त्यांना मिळू शकत नाही. दिल्लीवाले त्यांना हे भाग्य देऊ शकत नाही. आज जी परिस्थिती त्यांनी शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, ही परिस्थिती उद्या देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आताच जर यांचा सामना केला गेला नाही, तर कदाचित आगामी २०२४ ची निवडणूक ही शेवटची ठरू शकेल. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरू होऊ शकतो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.
निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी
पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर संताप व्यक्त करत निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे, अशी मागणी केली. “आत्ताचा निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेच ही आमची मागणी आहे”, असं ते म्हणाले.
पक्षनिधीवर स्पष्ट केली भूमिका
यावेळी पक्षनिधीवर बोलताना ते म्हणाले. “पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. नाहीतर निवडणूक आयोगावर खटला भरला जाईल. आयोगाला फक्त चिन्ह आणि नाव ठरवण्याचा अधिकार नाही. देशात निवडणुका घेणं, पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणं हा त्यांचा अधिकार आहे”