बीड दि. २० (प्रतिनिधी ) : जलजीवन योजनेच्या बाबतीत 'दाल मे कुछ काला है' असे वाटत होते, पण इथे तर 'सारी दाल ही काली है ' म्हणूनच जलजीवनची चौकशी व्हावी अशी मागणी जाणाऱ्या आमच्या युवक कार्यकर्त्यावर सीईओ दबाव आणत आहेत. जलजीवनमधील गैरप्रकारांना नेमके अभय कोणाचे आहे ? बीड जिल्हापरिषदेचे सीईओ हे अधिकारी आहेत का सेटलमेंट बादशाह असा घणाघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला. तसेच जलजीवनच्या चौकशीसाठी आयुक्तांकडे जाऊ, पाणीपुरवठा मंत्र्यांच्या दारात आंदोलन करू, वेळ पडली तर न्यायालयात जाऊ, पण राष्ट्रवादी युवक काँग्रेस आता मागे हटणार नाही, असेही मेहबूब शेख म्हणाले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांनी चार दिवसांपूर्वी बीड जिल्हापरिषदेत जलजीवन अभियानात झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करावी यासाठी मोर्चा काढला होता. हा मोर्चा निघू नये म्हणून बाळा बांगर यांच्यावर जिल्हापरिषद प्रशासनाने मोठ्याप्रमाणावर दबाव आणला. अगदी बांगर कुटुंबियांच्या शिक्षण संस्थांच्या शाळांची अचानक तपासणी लावली, जिल्हापरिषद प्रशासनाच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख स्वतः मैदानात उतरले आहेत.
बीड येथील पत्रकार परिषदेत मेहबूब यांनी जिल्हापरिषद प्रशासनाच्या दडपशाहीच्या धोरणावर टीकास्त्र सोडले. 'आम्ही चौकशीची मागणी करतोय, ती करण्याऐवजी आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव कसला आणता ? आयुक्तांनी केलेल्या चौकशीत जे दोषी आढळलेत त्यांच्यावर कारवाई करीत नाही, मात्र मोर्चा निघू नये म्हणून शिक्षण संस्थांच्या चौकशा लावता,आम्ही चौकशीला घाबरत नाही, मात्र जेथे गैरप्रकार सिद्ध झालेत, त्या जलजीवनमध्ये कारवाईची तत्परता का दाखवित नाही? नामदेव उबाळे, चव्हाण, वीर हे कोण आहेत, यांना कोणाचे अभय आहे ? यांच्यावर कारवाई का होत नाही? चौकशीची मागणी सीईओंना का झोंबली , तुम्ही हुकूमशाहसारखे वागणार असाल तर तुमची मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस उतरविल्याशिवाय राहणार नाही. जलजीवनची चौकशी करण्याऐवजी सीईओ सेटलमेंट बादशाहसारखे वागत आहेत. मात्र आम्ही हटणार नाही. २० दिवसात कारवाई झाली नाही तर आयुक्त कार्यालयावर आंदोलन करू, पाणीपुरवठा मंत्र्यांच्या दारात बसू, गरज पडली तर न्यायालयात जाऊ पण हा विषय सोडणार नाही असेही मेहबूब म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष बाळा बांगर, के.के.वडमारे आदींची उपस्थिती होती.
तर तुम्ही जेलात दिसाल..
आमच्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांच्या चौकशा करा,आम्ही त्याला घाबरत नाही. पण अनागोंदी कारभार करू नका, तो केल्यावर काय होते हे जमीन घोटाळ्यात काही अधिकाऱ्यांनी अनुभवले आहे. अधिकारी बदलतात, पण कागद मरत नसतो. उद्या तुमच्या चौकशा लागल्या तर तुम्ही जेलात दिसाल असा इशारा देखील मेहबूब यांनी सीईओंना दिला आहे.