बीड - पत्नी, दोन मुले, सुन आणि नातीने भरलेल्या सुखीसंपन्न कुटुंबातील ६४ वर्षीय रत्नाकर अंबादास बोरे हे २८ जुलै २०२१ रोजी नित्यनियमाने मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडले. पण तेव्हापासून ते घरी परतले नाहीत. रात्री कामावरून परत आलेले दोन्ही मुलांनी त्यांचा शहरभर शोध घेतला. पण ते आढळून आले नाही. त्यानंतर सोशल मीडियातून माहिती मिळताच राज्यभर दुचाकीवर प्रवास करत दोन्ही भावंडे वडिलांचा शोध घेत आहेत. राज्यभर विविध शहरात ४ हजार किमीचा प्रवास करूनही या भावडांना वडिलांना शोधण्यात अद्याप यश आले नाही.
बीड शहरातील पांगरी रोडवरील चक्रधर नगर येथे रत्नाकर अंबादास बोरे हे दोन मुलांसह राहतात. सायंकाळी नातीला घेऊन घराजवळच्या मंदिरात जाण्याची त्यांची सवय होती. २८ जुलै २०२१ रोजी नातीची तब्येत ठीक नसल्याने ते एकटेच मंदिरात जाण्यासाठी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. मात्र, रात्र झाली तरीही रत्नाकर बोरे घरी परतले नाही. याचवेळी मोठा मुलगा प्रसाद कामावरून घरी आला. त्याने वडिलांचा मंदिरात शोध घेतला असता वडील मंदिरात आलेच नसल्याचे कळले. लहान मुलगा प्रमोद यास माहिती मिळताच तो देखील वडिलांच्या शोधार्थ शहरात माहिती घेऊ लागला. रात्रभर नातेवाईक, मित्रांच्या सहाय्याने शोध घेऊन देखील रत्नाकर बोरे सापडले नाही. सोशल मीडियातून आवाहन केल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, आळंदी, पंढरपूर, शिर्डी येथे ते दिसल्याची माहिती मिळाली. याच्या आधारे बोरे भावडांनी दुचाकीवरून तिकडे धाव घेऊन शोध घेतला. मात्र, काही तासांच्या फरकाने ते तेथून दुसरीकडे गेल्याची माहिती मिळत गेली. पोलिसांची, सोशल मीडियाची मदत घेऊनही आजवर रत्नाकर बोरे यांचा शोध लागला नाही.
चार दिवस शोध, तीन दिवस काम
प्रसाद आणि प्रमोद हे दोघे खाजगी कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी आहेत. दोघेही वडिलांच्या शोधार्थ प्रत्येक आठवड्यात काही गावे ठरवून बाहेर पडतात. पण प्रवास आणि घर खर्च देखील सांभाळावा लागतो. हे जाणून दोघेही चार दिवस वडिलांचा शोध घेतात तर तीन दिवस काम करतात. यात नातेवाईक, विविध संस्था, मित्र परिवारांचा खंबीर साथ लाभत असल्याचे दोघेही सांगतात.
४ हजार किमीचा केला प्रवास
रत्नाकर बोरे हे गायब झाले त्या दिवशी बीड बसस्थानकावर दिसून आले होते. त्यानंतर ते औरंगाबाद बसस्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. यावरून बोरे बंधूंनी तिकडे धाव घेतली. त्यानंतर पिंपरी चिंचवड, पुणे, आळंदी, श्रीरामपूर, शिर्डी, पंढरपूर, परभणी, नांदेड, तुळजापूर, नाशिक, मनमाड, अक्कलकोट आदी शहरात तब्बल ४ हजार किमीचा प्रवास करून दोघांनी वडिलांचा शोध घेतला आहे. रत्नाकर बोरे तीर्थस्थळी जास्त दिसून येत आहेत. त्यांची माहिती 8014136136, 9975767808 या क्रमांकांवर देण्याचे आवाहन बोरे बंधूनी केले आहे.
इतर तिघांच्या घरच्यांना सापडून दिले
वडिलांच्या शोध मोहिमेत निघालेल्या बोरे बंधूंनी घरापासून दुरावलेल्या तिघांची नातेवाईकांसोबत भेट घडवून दिली आहे. माजलगाव, तालखेड आणि काळेवाडी येथील एक तरुण, एक वृद्ध तर एका तरुणी आता नातेवाईकांसोबत घरी राहत आहेत.