बीड-जलजीवन योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरकारभाराच्या तक्रारी समोर येत असून ही योजना गोरगरिबांसाठी आहे.जलजीवन योजनेला सध्या सुरुवात ही झाली नाही तोपर्यंत कंत्राटदारावर गुन्हा दाखल सुरु झाले.उद्या असेच प्रकार घडत राहिले तर बीड जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा ही ओळ्ख कायम राहिलं.त्यामुळे आम्ही आजचा 'जल धडक' मोर्चा काढल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी दिली.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे,कमल निंबाळकर,के.के.वडमारे,अविनाश सानप यांच्यासह तरुण आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आज दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर 'जल धडक' मोर्चा धडकला.तत्पूर्वी राष्ट्रवादी भवनपासून या मोर्च्याला सुरुवात झाली होती.छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा आल्यानंतर बांगर यांनी शिवरायांना अभिवादन केले.यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा आला.यावेळी निवेदन देण्यापूर्वी बांगर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हे नियम डावलून अनेकांना बोगस पद्धतीने काम वाटप करत आहेत. या योजनेतून कोट्यावधी रुपयांचा अपहार होण्याचे प्रकार समोर येत असून योजना सुरु झाली की नाही तोपर्यंतच केज तालुक्यात पहिला गुन्हा दाखल झाला.त्यामुळे या योजनेतील पारदर्शी कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गावागावात योजना फेल गेली तर 'पाणीबाणी' परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे जलजीवनमध्ये पारदर्शी कारभार व्हावा अशी मागणी केली.आजचा मोर्चा व्यक्तीच्या विरोधात नसून गावगाड्यावरील सर्वसामान्य जनतेसाठी असल्याचे ते म्हणाले.
यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी जलजीवन योजना गोरगरिबांसाठी असून तिचा लाभ सामन्यांना झाला पाहिजे असे सांगत पाणीपुरवठा मंत्री या योजनेसाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याची टीका केली.आमच्या मोर्चा व्यक्तीविरोधात नसून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात असल्याचे ते म्हणाले.यावेळी ढवळे यांनी आम्ही चूक असू तर आमच्यावर गुन्हा दाखल करा मात्र योजना गरिबांसाठी आहे याची जाणीव ठेवा असे आवाहन केले.यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे युवक,महिला पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बातमी शेअर करा