काही पदांचा सन्मान म्हणून त्या पदांवरील व्यक्तींना मान द्यावा लागतो, नाहीतर महाराष्ट्राने ज्यांना कधीच माफ देखील करू नये अशा भगतसिंह कोश्यारी यांचे अभिनंदन करणारा ठराव महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. ज्या कोशयारीनी महाराष्ट्राच्या बहुजन अस्मितांना डिवचण्याचा, अपमानित करण्याचे काम केले, त्या कोश्यारींचे अभिनंदन करून महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार कोश्यारींच्या नेमक्या कोणत्या ऋणातून उतराई होऊ पाहत आहेत?
महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन अखेर पायउतार झालेले भगतसिंह कोश्यारी यांचे महाराष्ट्राच्या राजभवनातले कारनामे कोणत्याच अर्थाने राज्यपालदपदाचा आबा राखणारे नव्हते, किंबहुना राज्यपाल कसा नसावा याचे उत्तम उदाहरण म्हणूनच नेहमी कोश्यारी यांच्याकडे पाहिले जायचे. भगतसिंह कोश्यारी हे मूळचे उत्तराखंडचे , संघाच्या मुशीतून, संघाचे बाळकडू पित वाढलेले, आणि अगदी राजभवनात आले तरी राजकारण करण्याची हाव न सुटलेले . त्यांचे उत्तराखंडमधून महाराष्ट्राच्या राजभवनात पुनर्वसन झाल्याने असे पुनर्वसन कारणांप्रती त्यांनी कृतज्ञ राहणे एकवेळ समजू शकते , कारण मागच्या काही वर्षात राजभवनाच्या तटस्थ राहावे अशी अपेक्षा म्हणजे अळवावरचे पाणी ठरावे अशीच परिस्थिती देशभरात आहे, त्यामुळे सामान्यांना आता या परिस्थितीपुढे शरण जाण्यावाचून दुसरा पर्याय राहिलेला देखील नाही. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातून खेळू नयेत ते सारे राजकीय खेळ खेळले , अनेकदा राजकीय सारीपाटावर स्वतःच्या हातात सोंगट्या घेऊन ते भाजपला अनुकूल दान पडत राहिले. राज्यपालांनी असे काही वागणे संसदीय संकेतात बसत नसले तरी एकवेळ तो कोश्यारींचा संस्कार समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो.
मात्र राजकीय कुटीलपणा करणाऱ्या कोशयारीनी महाराष्ट्राच्या अस्मितांशी खेळण्याचा जो विकृतपणा केला त्यासाठी मात्र महाराष्ट्र त्यांना कधीच माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला आहे. ही महान व्यक्तिमत्वे या महाराष्ट्राच्या बहुजन समाजाच्या प्रेरणा आणि अस्मिता आहेत . आणि कोशयारीनी या बहुजन चेतांनाचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. कोश्यारी जे काही बोलले ते अनावधानाने असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही, ते ज्या ज्या वेळी बोलले त्यावेळी त्यांच्या प्रत्येक वक्तव्यामध्ये आमच्या बहुजन चेतनांची टिंगल उडविण्याचा भाव स्पष्ट दिसत होता. राजकारण म्हणून कोश्यारी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारला विरोध करीत होते , त्याचे काही नाही, मात्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले दाम्पत्य आणि एकूणच महाराष्ट्रातील बहुजन अस्मितांना विरोध करण्यात किंवा त्यांचा उपमर्द करण्यात कोश्यारींची एक विकृत , मनुवादी मानसिकता होती, आणि ते ज्या विचारधारेचे वाहक असे स्वतःला मानतात, त्या विचारधारेचे ती प्रतीक होती, हे स्पष्ट आहे. त्यामुळे खरेतर अशा विकृतीच्या नांग्या ठेचायला हव्यात , मात्र असे असताना केंद्रातील मोदी सरकारने अनेक दिवस कोश्यारींना पाठीशी घालण्याचे काम केले. आणि आता राज्याच्या राजकारणाची गरज म्हणून , कोश्यारी राजभवनातून गेल्या शिवाय विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा प्रश्न मार्गी लागणार नाही हे स्पष्ट झाल्याने असेल किंवा राज्यातील सत्ता संघर्षांवरची जी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे, तीत बळीचा बकरा बनवायला कोणीतरी हवे म्हणून असेल , पण कोश्यारींना जावे लागले आहे. कारण काही का असेना , पण कोश्यारीनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मागे लागलेली ब्याद गेली अशीच सर्वसामान्यांची भावना असताना, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने कोश्यारी यांच्या अभिनंदनाचा ठराव करावा हे महाराष्ट्राच्या बहुजन अस्मितांवर ज्या जखमा कोश्यारी करून गेले आहेत, त्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. कोशयारीनी जे काही केले, ते महाराष्ट्राचे नव्हते आणि त्यांना महाराष्ट्रात राहायचेही नव्हते, मात्र असल्या विकृतीचे अभिनंदन करून शिंदे फडणवीस सरकार नेमके काय सिद्ध करू पाहत आहे ? कोशयारीनी महाराष्ट्राच्या बदनामीचे जे पाप केले, त्या पापावर महाराष्ट्र सरकार अभिनंदनाची शाल का पांघरू घालत आहे? कदाचित शिंदे फडणवीसांवर कोश्यारींचे उपकार असतील, ते आहेतच, तर त्यांनी स्वतः कोश्यारींचे वडीलकीच्या भावनेतून ऋण मानायला हरकत नाही, पण सरकारच्या वतीने, म्हणजे राज्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करणे सर्वथा गैर आहे.