Advertisement

आ. सोळंकेंसाठी सोपी नाही भाजपची वाट

प्रजापत्र | Wednesday, 15/02/2023
बातमी शेअर करा

संजय मालाणी

बीड दि. १४ : राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांनी दोन दिवसापूर्वी 'माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत आणि जनतेची इच्छा असेल तर मी भाजपाठी जाईल ' असे वक्तव्य करून राष्ट्रवादीवरील दबाव वाढविला आहे. यावर राष्ट्रवादीमधील कोणत्याही नेत्याने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही उद्या आ. प्रकाश सोळंके खरेच भाजपात गेले तरी त्यांची भाजपमधील वाट तितकीशी सोपी नसेल हे मात्र नक्की .

आ. प्रकाश सोळंके हे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीमधील जेष्ठ आमदार आहेत. ते सध्या राष्ट्रवादीत असले तरी ते मूळचे काँग्रेसचे, मधल्या काळात भाजपच्या मांडवात वरूनच त्यांनी आयुष्यातील पहिली आमदारकी मिळविली, भाजपकडून दोन वेळा आमदार राहिल्यानंतर ते राष्ट्रवादीत आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीत त्यांना स्वतःच्या मतदारसंघातही अनेकांचा विरोध होताच. राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना काही काळ राज्यमंत्री म्हणून देखील पक्षाने संधी दिली. मात्र आता आ. प्रकाश सोळंकेंना कॅबिनेट मंत्रिपद खुणावत आहे. त्यांनी आपली मंत्रिपदाची अपेक्षा लपवून देखील ठेवलेली नाही. मुळात धनंजय मुंडे याना मंत्रिपद दिले गेले तेव्हा देखील त्यांनी बऱ्यापैकी आदळआपट केली होती, मात्र त्यावेळी राष्ट्रवादीने त्याकडे दुर्लक्ष केले.

आता राष्ट्रवादीची महाराष्ट्रात सत्ता नाही, त्यांना सत्तेचे पद नसेल तर पक्ष संघटनेत मोठे पद हवे आहे. मात्र पक्षातून ते देखील मिळत नसल्याने आ. सोळंकेंची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. त्यातूनच ते अनेकदा आपण भाजपशी जवळिक साधत असल्याचे संकेत देत असतात . माजलगाव मतदारसंघात तर आ. सोळंके भाजपात जाणार असल्याच्या चर्चा अधून मधून नेहमीच होतच असतात.

आता प्रश्न आहे तो आ. सोळंके खरेच भाजपात गेले तर त्यांना मिळणार तरी काय ? माजलगाव मतदारसंघात आज भाजपकडे रमेश आडसकर , मोहन जगताप अशी मोठी आणि आ. सोळंकेंपेक्षा तुलनेने तरुण नावे आहेतच. भाजपने मागच्या काही काळात जेष्ठांना घरी बसविण्याचे जे धोरण सुरु केले आहे, त्यात आ. सोळंकेंना पक्षात घेऊन मंत्री करणे भाजपला कसे जमायचे ? त्यातही धोरण बाजूला ठेवून यांना मंत्रिपद द्यायचे असेल तर त्यांची पक्षाला तशी 'उपयुक्तता ' काय हा देखील प्रश्न आहेच. कारण आ. प्रकाश सोळंके यांनी आजपर्यंतच्या कारकिर्दीत माजलगाव मतदारसंघाच्या बाहेर कधी स्वतःची 'शक्ती' किंवा 'उपद्रवमूल्य ' दोन्ही दाखविलेले नाही. किंवा कोणा एका समाजाचे सर्वमान्य नेते अशी देखील आ. सोळंकेंची प्रतिमा नाही. त्यामुळे केवळ एका मतदारसंघासाठी नवीन नेत्याला मंत्री करण्यास भाजपचे श्रेष्ठ कितपत तयार असतील हीच आ. सोळंकेच्या भाजपच्या संभाव्य वाटेवरील मोठी अडचण असेल.

मागच्या काही काळात आ. प्रकाश सोळंकेंची एकंदर देहबोली आणि त्यांचा आक्रमकपणा वाढलेला आहे. मात्र सध्या जो भाजप फडणवीसांनी स्वतःच्या अंकित केलेला आहे, त्यात हा आक्रमकपणा आणि अनेकदा पक्षाला आव्हान देण्याची भूमिका कशी जमणार हा देखील प्रश्न आहेच. त्यामुळेच आ. सोळंकेनी भलेही 'सर्व पर्याय खुले असल्याचे ' सांगत राष्ट्रवादीवरील दबाव वाढविला असेल, त्यांची भाजपची वाट तितकी सोपी नसणार हे नक्की.

Advertisement

Advertisement