Advertisement

आठवणीत राहतील जिल्हाधिकारी शर्मा.....

प्रजापत्र | Tuesday, 14/02/2023
बातमी शेअर करा

बीड - जिल्हाधिकारी म्हणून रहदाबिनोद शर्मा यांच्या कारकिर्दीचे वेगवेगळे पैलू असले तरी शेतकरी हिताच्या निर्णयासाठी राधाबिनोद शर्मा यांची जिल्ह्याला कायम आठवण राहील. मागच्या खरीप हंगामात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी असेल किंवा सुरुवातीच्या काळात पावसाने खंड दिल्याने निर्माण झालेली परिस्थिती असेल, जिल्हाधिकारी शर्मा यांनी स्वतः पुढाकार घेऊन विमा कंपनीने शेतकऱ्यांना अग्रीम द्यावा अशी अधिसूचना जिल्ह्यातील बहुतांश मंडळांसाठी काढली होती. अतिवृष्टीसोबतच सततचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करून तब्बल ४०० कोटींच्या अनुदानाचा प्रस्ताव देखील शर्मा यांनी स्वतः पुढाकार घेऊन शासनाकडे पाठविला होता. तो प्रस्ताव शासनाने मान्य केला नसला तरी यात शर्मांची तळमळ मात्र दिसून आली. शेतकऱ्यांच्या पीककर्जासंदर्भात बँकांची बैठक घेण्याचा विषय असेल किंवा शेतकरी आत्महत्यांच्या विषयातील कारवाई असेल , शर्मांचे वजन कायम शेतकऱ्यांच्या पारड्यात असायचे. 
 

Advertisement

Advertisement