राज्यातील सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आज अपेक्षित असतानाच, अचानक देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडीओ माध्यमांमध्ये येतो आणि त्यात ते 'पहाटेच्या शपथविधी ' विषयी भाष्य करतात हा योगायोग नक्कीच नसतो. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फुटीमुळे जी काही उलथापालथ घडली त्यावरील सुनावणी आजपासून अपेक्षित असल्याने यात साहजिकच अनेकांच्या अब्रूची शकले उडणार आहेत, अशावेळी राजकारणात आम्ही बदनाम असलो म्हणून काय झाले, इतरही आमच्याच पंक्तीत बसणारे आहेत याच वातावरण निर्मितीसाठी अचानक पहाटेच्या शपथविधीच्या शिळ्या कढीला ऊत आणला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर राज्याला फार मोठा राजकीय धक्का दिलेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला आता तीन वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. या काळात पुलाखालून कितीतरी पाणी वाहून गेले. हा शपथविधी फिका वाटावा अशा राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेसारख्या पक्षात आजवरची सर्वात मोठी फूट पडली आणि या मागची 'मोठी शक्ती ' कोण होती हे आता सर्वांच्याच लक्षात आलेले आहेच. राजभवनाचा किती मनमानी वापर करता येऊ शकतो याचे नवे मापदंड मधल्या काळात राज्याला पाहायला मिळाले आहेत. अनिर्बंध सत्ता काय काय घडवू शकते याचे दर्शन महाराष्ट्राला मागच्या काही काळात झाले. भाजपचा सत्तापिपासूपणा मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहायला भाग पाडू शकतो हे देखील आता जुने झाले आहे. याची उजळणी यासाठी की मागच्या काही दिवसात इतके काही घडून गेले आहे, की आता त्या पहाटेच्या शपथविधीमध्ये कोणाला काही नावीन्य वाटण्याचे दिवस देखील संपले आहेत.
मात्र असे असतानाही राज्यातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आज सुरु होणार असतानाच या सुनावणी च्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ अचानक माध्यमांमध्ये येतो, आणि त्यात फडणवीस , त्या शपथविधीबद्दल भाष्य करताना 'ही तो शरद पवारांची इच्छा ' अशा धाटणीचे विधान करतात , त्यावेळी आमचे सारे काही ठरले होते आणि ते शरद पवारांच्या मर्जीनेच सुरु होते असे सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मुळात देवेंद्र फडणवीस जे काही सांगत आहेत, त्यात तथ्य आहे असे जरी गृहीत धरले तरी त्या व्हिडीओचे आताच औचित्य काय हा प्रश्न आहेच. अजित पवारांच्या त्या शपथविधीनंतर यावर राष्ट्रवादीमधील अनेकांच्या प्रतिक्रिया या पूर्वीच आलेल्या आहेतच. अगदी शरद पवारांनी देखील ' आता हि गोष्ट जुनी झाली आहे, त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही ' असे सांगून झाले आहे. त्या शपथविधीनंतरही महाविकास आघाडीने शरद पवार यांच्यावर नुसता विश्वासच ठेवला नाही , तर अजित पवार महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देखील राहिले. त्यामुळे त्या विषयावरून संशयाचे मळभ निर्माण करावे असे आता काय आहे ? भाजप आणि देवेंद्र फडणवीस राजकारणात शिळ्या कढीला ऊत का आणीत आहेत ?
ज्यांना ज्यांना भाजप, संघ परिवार आणि देवेंद्र फडणवीसांची माहिती आहे, त्यांना हे देखील माहिती असेलच की हे लोक विनाकारण काहीच करीत नाहीत. यांच्या प्रत्येक कृतीमागे पूर्वनिश्चित असा कार्यकारणभाव सरोच असतो. आताही फडणवीसांचा जुना व्हिडीओ सहजच समोर आला असेल असा विचार करणे बाळबोधपणाचे होईल. मुळात आजपासून सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी अपेक्षित आहे, ती अपेक्षेप्रमाणे सुरु झालीच , तर यात अनेक राजकीय नात्यांवरील पडदा उघडला जाणार आहे. राजकारणात कोणत्या पातळीवर जाऊन षडयंत्र आखले जाते ते देखील समोर येणार आहे. साधी अविश्वासाची नोटीस देऊन उपाध्यक्षांचे हात बंधने असेल, किंवा विश्वासमत प्रस्तावाचे कोणतेही पत्रच राजभवनात उपलब्ध नसतानाही झालेला शिंदे सरकारचा शपथविधी असेल, आणखी बऱ्याच गोष्टी आणि त्यात राजभवनाच्या सारीपाटावर कोश्यारींना पुढे करून हलवल्या गेलेल्या सोंगट्या असतील, हे सारे काही न्यायालयीन सुनावणीत समोर येईल अपेक्षित आहे. आणि यातून अर्थातच भाजपचा राजकीय कुटील चेहरा देखील पुन्हा एकदा जगासमोर येणार आहे. त्यामुळे राजकारणात आम्ही एकटेच कुटील नाही , तर सगळेच पक्ष आमच्याच पंक्तीत बसणारे आहेत हे सांगता यावे, यासाठीच जे जनतेच्या विस्मृतीत गेले आहे, ते पुन्हा ठसविण्याचाच प्रयत्न या शपथविधीच्या विधिवमागे, शिळ्या कढीला ऊत आणण्यामागे आहे.