दिंद्रुड : आजीने नवीन चप्पल घेतली नाही याचा राग मनात धरून १० वर्षीय नातवाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत घडली. युवराज श्रीमंत मोरे असे मृत मुलाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंद्रुड पोलीस हद्दीतील बोडखा का. येथील युवराज श्रीमंत मोरे (१०) याचे आईवडील उसतोड मजूर आहेत. त्यामुळे युवराज आजोळी हिंगणी (खु) येथील विश्वनाथ काशिनाथ उजगरे यांच्याकडे आला होता. दरम्यान, युवराजने नवीन चप्पल आजीला मागितली. मात्र, त्याच्या मागणीची पूर्तता न झाल्याने युवराज आई-वडिलांकडे जातो असे, म्हणून घराबाहेर पडला. त्यानंतर गावाजवळच असलेल्या एका झाडाला साडीने गळफास घेत त्याने आत्महत्या केली.
माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह रवाना केला.