बीड दि. १३ (प्रतिनिधी ) : 'मेरा गाण अर्पित , मेरा प्राण अर्पित , रक्त का कण कण समर्पित , ए मेरी परली की धरती , चाहता हू तुझे कुछ और दे दू ' अशा शायराना अंदाजात हजारो परळीकरांना साद देत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी सायंकाळी परळीकरांची मने जिंकली. अपघातातून बरे होऊन परत आलेल्या धनंजय मुंडेंचे परळीकरांनी केलेले स्वागत जितके भव्य होते , तितकेच या स्वागतला धनंजय मुंडे यांनी दिलेले उत्तर भावनेने चिंब झालेले होते .
महाराष्ट्रात कोठेही गर्दी जमवू शकणारे जे काही मोजके नेते आहेत, त्या पैकी धनंजय मुंडे हे एक. त्यांची भाषणेही ऐकणाराने ऐकतच जावीत अशीच. त्यातही परळी म्हणजे त्यांचे होम पीच . अपघातामुळे या परळीपासून महिनाभरापेक्षा अधिक काळ दूर असलेले धनंजय मुंडे रविवारी परळीत आले . कदाचित परळीपासून इतका प्रदीर्घ काळ दूर राहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असावी . त्यामुळे अपघातानंतर बरे होऊन आलेल्या आपल्या नेत्याला पाहण्याची, भेटण्याची जितकी ओढ परळीतील धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना होती, तितकीच परळीकरांना भेटण्याची ओढ धनंजय मुंडेंनाही. आपल्या लाडक्या नेत्याचे जंगी स्वागत करण्यात परळीकरांनी कोणतीच कमी सोडली नाही आणि मग परळीकरांच्या स्वागताला उत्तर देताना भावनिक न होतील ते धनंजय मुंडे कसले . अशीही धनंजय मुंडे यांची भाषणे ह्रदयाचा ठाव घेणारी असतातच, मात्र रविवारचा त्यांचा नूरच वेगळा होता. शायराना अंदाजात धनंजय मुंडे बोलत होते आणि परळीकर कानात प्राण आणून ऐकत होते. या परळीचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत आणि ते फेडण्यासाठी जीवन समर्पित करून देखील आणखी काही करण्याची इच्छा आहे , हा धनंजय मुंडे यांनी शायरीतून व्यक्त केलेला भाव असेल, किंवा अडचणीच्या काळात त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह लावणारांना ' नशिबने जरासा साथ क्या न दिया, लोगोने हमारी काबिलीयत पे शक करना सुरू किया ' या शब्दात त्यांचा घेतलेला समाचार आणि पुन्हा परळीकरांप्रती भावनांनी ओथंबलेल्या शब्दात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलेले ऋण आणि भविष्यातील कामाची दाखविलेली दिशा, एक वेगळेच धनंजय मुंडे परळीकरांना अनुभवता आले. आणि आपल्या नेत्याच्या या 'ग्रँड एन्ट्रीने ' परळीकर भारावले. नेहमीप्रमाणे धनंजय मुंडेंनी परळीकरांना जिंकले हे वेगळे सांगायलाच नको .