Advertisement

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची होणार चौकशी!

प्रजापत्र | Wednesday, 25/11/2020
बातमी शेअर करा

मुंबई:विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या कथीत घोटाळ्याप्रकरणी चौकशीचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी जारी केले आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबत माहिती दिली. 'अध्यक्ष कोणीही असले तरी, चुकीच्या कामाची चौकशी होणारच,' असे वक्तव्य बाळासाहेब पाटील यांनी केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत. दरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असताना मुंबै बँकेबद्दल अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. नंतर दरेकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 5 वर्षात या प्रकरणी कुठलीही चौकशी झाली नाही. आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुंबै बँकेच्या कथीत घोटाळ्याबाबत चौकशी करण्याचे आदेश सहकार खात्याकडून देण्यात आले आहेत.

चौकशीला घाबरत नाही- प्रवीण दरेकर
याप्रकरणी दरेकरांनी कुठल्याच चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. 'मुंबै बँक नफ्यात आहे. बँकेला अ वर्ग दर्जा मिळाला आहे. या बँकेवर माझ्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही प्रतिनिधी आहेत. पण, मागील काही दिवसांपासून आम्ही सरकारच्या अनेक घोटाळ्यांबाबत बोललो. त्यामुळे सूडाचे राजकारण करत ही चौकशी करण्यात येत आहे,'अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

 

Advertisement

Advertisement