Advertisement

नेकनूरात वाहतूक कोंडी

प्रजापत्र | Saturday, 11/02/2023
बातमी शेअर करा

अशोक शिंदे
 
नेकनूर मधील पोलीस स्टेशन रोडवर व राष्ट्रीय महामार्गावर झालेले अतिक्रमण त्यापुढे हॉटेल चे बाकडे , त्या समोर अस्ताव्यस्त उभ्या असणाऱ्या गाड्या, मोटरसायकल, यामुळे दररोजच नेकनूरकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करण्याची वेळ आली असताना. कोणीच काहीच करत नसल्याने नेहमीच या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती परंतु या वाहतूक कोंडीला आयपीएस पंकज कुमावत यांनी आळा घालण्याच्या दृष्टीने शनिवारी सकाळी रस्त्यावर उतरत कारवाईचा बडगा उगारताच रस्ता सुपडा साफ झाला असल्याचे दिसून येत आहे. 

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत नेकनूर मध्ये आले असता वाहतूक कोंडीमुळे अडथळा निर्माण झाल्यानंतर त्यांनी चक्क रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला. नेकनूर मधून जाणाऱ्या राज्य रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळून जवळपास चार वर्षाचा कालावधी झाला असून या सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे.  नुरणी चौकातील काम वगळता रस्त्याचे जवळपास सर्व काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याच्या कामामुळे  ग्रामपंचायत समोर अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असून ठेकेदाराकडून खोदून ठेवलेला रस्त्यामुळे त्यामध्ये आणखीनच भर पडत आहे. नेकनूरमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा चार पदरी होत असून. या ठिकाणी अनेक व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. एक तर व्यवसायिकांचे रस्त्यावर झालेले अतिक्रमण त्यापुढे हॉटेलचे बाकडे आणि त्या समोर उभ्या असणाऱ्या मोटरसायकल, चारचाकी वाहने यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असून गेले वर्षानुवर्षे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे यामध्ये आणखीनच भर पडत आहे. या ठिकाणी असणारी वाहतूक कोंडी व अतिक्रमण हे सर्वसामान्य लोकांना दिसत आहे पण येथील पोलिसांना मात्र याविषयी काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. आज शनिवारी सकाळी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे काही कामानिमित्त नेकनुर येथे आले असता त्यांना वाहतूक कोंडी दिसून आली त्यावेळी त्यांनी थेट रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारून वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्याबरोबर नेकनूर मधील पूर्ण पोलिस यंत्रणा सुद्धा वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कामाला लागली होती. यावेळी काही जणांना पोलिसांचा प्रसादही मिळाला. पोलिसांनी थोडे लक्ष दिले तर रस्त्यावर वाहतूक कोंडी व अतिक्रमण होणार नाही.  यासाठी येथील ठाणे प्रमुखांनी या गोष्टीकडे स्वतः लक्ष देणे गरजेचे आहे.  अन्यथा यापुढे अशीच वाहतूक कोंडी नियमितपणे झालेली दिसेल.

Advertisement

Advertisement