केंद्रात आपल्या विचारांचे सरकार आहे, म्हणजे आपण कोणतीही याचिका केली की न्यायालय ते मान्यच करेल किंवा आपण आता देशात हवे ते करू शकतो अशी मानसिकता मागच्या काही काळात वाढलेली आहे. हिंदू सेना हा त्याच मानसिकतेचा नमुना आहे. या हिंदू सेनेने आपल्या उतावीळ मानसिकतेतून थेट बीबीसीवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, ती फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने असल्या उतावीळ मानसिकतेला चपराक लगावली आहेच, त्यासोबतच माध्यमांची मुस्कटदाबी करू पाहणाऱ्या मानसिकतेला देखील धक्का दिला आहे.
बीबीसीच्या मोदींवरील डॉक्युमेंट्रीचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या डॉक्युमेंट्रीने निर्माण केलेले वादळ अजून शमलेले नाही. त्यातच या डॉक्युमेंट्रीचे कारण पुढे करून हिंदू सेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आणि त्यात थेट बीबीसीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. या याचिकाकर्त्यांचा उतावीळपणा इतका की ' इंग्लंडमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान आहेत, म्हणून त्यांना विनंती करावी ' असा अजब युक्तिवाद देखील याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. मागच्या काही काळात असल्या अर्धवटरावांची संख्या देशात मोठ्याप्रमाणावर वाढलेली आहेच. देशात मोदींचे सरकार आहे, म्हणजे जसे काही राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद अशी नावे घेतली की आपण काहीही करू शकतो असे समजणारांचा एक मोठा वर्गच देशात निर्माण झालेला आहे. अनेकदा या वर्गाच्या अस्मितांना केंद्रीय सत्तेने हवा देखील दिलेली असल्याने असल्या उताविलांना मूठभर मांस चढलेले आहेच. त्यातूनच मग बीबीसीसारख्या वृत्तसंस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जाते.
ही मागणी करणारी याचिका हिंदू सेनेच्या नावाने करण्यात आलेली असली, तरी अशी माध्यमांची मुस्कटदाबी करणारी एक मानसिकताच मागच्या काळात वाढली आहे, ही याचिका त्याच मान्स्कीटचे प्रतीक होती. मोदींवरील डॉक्युमेंट्रीमुळे ज्यांना मिरच्या झोंबल्या त्यांनी ही याचिका दाखल केली यावरूनच या याचिकेच्या मागे कोण असेल हे वागले सांगण्याची आवश्यकताच राहत नाही. बीबीसीच्या 'त्या ' डॉक्युमेंरिमध्ये गुजरात दंगलीतील मोदींच्या (गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री ) भूमिकेची चिकित्सा करण्यात आलेली आहे. मात्र मागच्या काही वर्षात मोदींची चिकित्सक करायची नाही असे मानणारा एक वर्ग निर्माण झाला आहे. ज्यावेळी इंदिरा गांधी सर्वोच्च सत्ता उपभोगत होत्या, त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी 'इंदिरा इज इंडिया ' असे वक्तव्य केले होते, त्याची अजूनही निर्भर्त्सना करणाऱ्या पक्षाचे वारसदार आता मोदी आणि अदानी म्हणजे देश असे समीकरण करू पाहतात आणि इतके झाल्यानंतर देखील मोदींच्या भूमिकेची साधी चिकित्सा या भक्तांना सहन होत नाही, याही पेक्षा अधिक म्हणजे आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्याचे धारिष्ट्य या उतावीळरावांमध्ये येते याला काय म्हणावे?
त्यामुळेच ' न्यायालयाने पूर्णपणे सेन्सॉरशिप लागू करावी असे तुम्हाला वाटते काय? हे सर्व काय आहे?तुम्ही आमचा वेळ का वाया घालत आहेत ? ' अशा शब्दात याचिकाकर्त्यांना फाटकारून एक चांगला संदेश दिला आहे. आपण काहीही करू शकतो अशी जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेला हि चपराक आहे. यात हिंदू सेनेची याचिका फेटाळली गेली असेल, मात्र खरे थोबाड फुटले आहे ते अभिव्यक्तीचा गळा दाबू इच्छिणाऱ्या मानसिकतेचे .