बीड दि.१० (प्रतिनिधी)-जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या दिवशी खराब भगरीतून विषबाधेच्या घटना घडू नये यासाठी अन्न प्रशासन कामाला लागले आहे.जिल्हाभर भगर,शाबूदाणाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार असून दुकानदार आणि विक्रेत्यांनी आपल्या मालाची विक्री करताना योग्य ती खबरदारी घेण्याच्याही सूचना अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी दिल्या.
सध्या महाशिवरात्री आठ दिवसांवर येऊन ठेपली असून यादिवशी उपवास करणाऱ्यांचे प्रमाण लाखोंच्या घरात असते.यावेळी काही दुकानदार आणि वितरक खराब भगरीची विक्री करतात.त्यामुळे अनेकांना उलटी,मळमळीचा त्रास जाणवू लागतो.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अन्न प्रशासनाने जिल्हयात सर्वत्र दुकानदार आणि विक्रेत्यांच्या खाद्यतेल,भगर,शाबूदाणा यांच्या पदार्थ्यांच्या नमुन्यांची तपासणी मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी नागरिकांना उपवासाचे पदार्थ घेतावेळी अन्न परवाना असलेल्या व्यक्तींकडूनच पदार्थांची खरेदी करावी,भगर,शाबूदाणा,खाद्यतेल पॉकिटबंद व ब्रँडेड घ्यावेत,या वस्तूंच्या मुदतीची यावेळी पाहणी करण्यात यावी,भगरीचे पीठ बाजारातून विकत घेऊ नये आणि भगर करण्यापूर्वी घरात स्वच्छ धुवून नंतर करावी असे हाश्मी यांनी म्हटले आहे.