देशात पहिल्यांदाच 59 लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या रियासीमध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) द्वारे चिन्हांकित करण्यात आलेली ही पहिली लिथियम (G3) साइट आहे. लिथियम हा एक नॉन-फेरस मेटल (अलोह धातू) आहे, ज्याचा वापर मोबाइल-लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि इतर उपकरणांच्या चार्ज करण्यायोग्य बॅटरी निर्मितीसाठी केला जातो. हे एक दुर्मिळ अर्थ एलिमेंट आहे. सध्या भारत लिथियमसाठी पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत त्याचा साठा मिळाल्याने इतर देशांवरील अवलंबित्व कमी होईल. देशातील लिथियमचा वापर लक्षात घेता हा साठा खूप महत्त्वाचा ठरू शकतो.
फोनपासून ते सौर पॅनेलपर्यंत लिथियम गरजेचे
केंद्रीय खाण सचिव विवेक भारद्वाज यांनी सेंट्रल जिओलॉजिकल प्रोग्रामिंग बोर्डाच्या (CGPB) बैठकीत सांगितले की, महत्त्वाच्या खनिजांची सर्वत्र गरज आहे, मग ते मोबाइल फोन असो किंवा सौर पॅनेल. ते म्हणाले की, देशाला स्वावलंबी होण्यासाठी महत्त्वाची खनिजे शोधणे आणि साठवणे अत्यंत आवश्यक आहे. सोन्याची आयात कमी झाल्यास आपण स्वयंपूर्ण होऊ, असेही विवेक म्हणाले. गेल्या वर्षी राज्यसभेच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात लिथियमचे स्रोत सापडल्याची माहिती दिली होती.
GSI ने राज्य सरकारांना 51 खनिज ब्लॉक्सचा अहवाल सादर केला
62व्या CGPB बैठकीत, GSI ने लिथियम आणि सोन्यासह 51 खनिज ब्लॉक्सचे अहवाल राज्य सरकारांना सादर केले. GSI ने 2018-19 च्या फील्ड सीझनपासून केलेल्या कामाच्या आधारे हा अहवाल सादर केला आहे. याशिवाय एकूण 7897 मिलियन टन संसाधनांसह कोळसा आणि लिग्नाइटचे 17 अहवाल कोळसा मंत्रालयाला सादर करण्यात आले. लिथियम एक दुर्मिळ पृथ्वी घटक आहे. आतापर्यंत भारत आपली 100 टक्के लिथियमची गरज चीन आणि इतर देशांमधून भागवत असे.
11 राज्यांमध्ये खनिज संसाधने सापडली
खाण मंत्रालयाने माहिती दिली की, या 51 खनिज ब्लॉक्सपैकी 5 ब्लॉक सोन्याशी संबंधित आहेत. तसेच पोटॅश, मॉलिब्डेनम हे मूळ धातूंशी संबंधित आहेत. 11 राज्यांतील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे धातू सापडले आहेत. या राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा यांचा समावेश आहे.
लिथियमच्या बाबतीत भारत कुठे?
भारतात लिथियमचे उत्पादन फारच कमी आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा भाग आयात करतो. 2020 मध्ये, लिथियम आयातीच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर होता. तेव्हा 14.4 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 110 कोटी रुपयांचे लिथियम आयात केले होते. भारत आपल्या लिथियम-आयन बॅटरीजपैकी 80% चीनमधून आयात करतो. या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी भारत अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया आणि बोलिव्हिया यांसारख्या लिथियम समृद्ध देशांमधील खाणींमध्ये हिस्सा विकत घेण्यावर काम करत आहे.