Advertisement

सरनाईकांच्या घरावरील छापेमारीवर संजय राऊत म्हणाले,'ईडी'ने आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडली

प्रजापत्र | Tuesday, 24/11/2020
बातमी शेअर करा

मुंबई : मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ईडीनं आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. आमच्या आमदार, खासदारांच्या घरासमोर ईडीनं तळ ठोकला तरी आम्ही घाबरणार नाही, अशा इशाराच राऊत यांनी दिला आहे. ‘प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरावर टाकलेला छापा म्हणजे नामर्दानगी आहे. दिल्लीतूनच नाही तर इंटरपोलची टीम आली तरीही काही फरक पडणार नाही. भाजपनं सरळ लढाई करावी. शिखंडीसारखं ईडी किंवा सीबीआयचं बाहुलं हाती धरुन कारवाई केली तरी आम्ही घाबरत नाही’, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. सरकार आणि सरकारशी संबंधित लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. पण कितीही त्रास द्या, कितीही खोटे गुन्हे दाखल करा, कितीही खोटे कागदपत्र तयार करा, पण शिवसेना किंवा महाविकास आघाडीचा एकही आमदार भाजपच्या हाती लागणार नाही, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

साम, दाम, दंड, भेदात आमची डॉक्टरेट- राऊत
2 महिन्यात राज्यात सत्तापालट होऊन भाजपचं सरकार येईल, असा दावा भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यावर साम, दाम, दंड, भेदात आमची डॉक्टरेट झाली आहे. त्यातूनच आमचा जन्म झाला आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेदाची भाषा आमच्यासमोर करु नका, असा दम संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना भरला आहे. पुढील पाच नाही तर आता भाजपनं पुढील २५ वर्षे सत्तेची स्वप्न पाहू नयेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

 

Advertisement

Advertisement