Advertisement

धडपडीला मिळाला न्याय

प्रजापत्र | Saturday, 04/02/2023
बातमी शेअर करा

समीर लव्हारे

बीड : खरं तर एखाद्या राजकीय कुटुंबात जन्म होणं हीच अनेकांसाठी पुढची पदं मिळविण्यासाठीची पात्रता असते. त्यासाठी पुन्हा काही वेगळं करावं अशी गरज अनेकांना नसते. पण असं असतानाही कोरोनाच्या काळात ज्या वेळी जवळचे लोक रुग्णाला धिर द्यायला धजावत नव्हते. त्या काळात खेड्या पाड्यात स्वत: पोहचून रुग्णांना केवळ मानसिक नव्हे तर आर्थिकही आधार देत त्यांना रुग्णालयात घेवून जाणे आणि पुन्हा बरे करुन आणून सोडणे हे मोठे काम ‘त्या’ कार्यकर्त्याची धडपड दाखवून देत होते. भायाळा गावात सरपंच पदाची संधी मिळाल्यानंतर त्या गावाचा चेहरा बदलण्यासाठी ‘त्या’ कार्यकर्त्याने केलेली धडपड त्याच्यातील वेगळेपण दाखविणारी होती. अगदी पक्षाच्या संघटनात्मक कामात झोकून देताना सामान्य कार्यकर्त्यासोबत उभे राहण्यातलं ‘त्याच’ सामान्यपण देखील वेगळंच. अशा तरुणाला अर्थात विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांना राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचं जिल्हाध्यक्षपद मिळणं हा खर्‍या अर्थाने एका धडपडीला मिळालेला न्याय आहे.

 


 

बीडच्या सहकार आणि शिक्षण क्षेत्रात रामकृष्ण बांगर आणि सत्यभामा बांगर या दाम्पत्याचं मोठ नाव आहे. त्यामुळेच पाटोदा तालुक्यावर या कुटुंबाचा राजकीय दबदबा देखील तितकाच मोठा. या कुटुंबातला मुलगा म्हणल्यानंतर फार काही केलं नाही तरी राजकारणात चालण्यासारखं होतं. राजकारणात वारसांना सहज स्विकारण्याची बीड जिल्ह्याची मानसिकता असल्याने बांगर कुटुंबातल्या पोराला खेड्यापाड्यात फिरण्याची फार गरज होती अशी नाही. पण उच्च शिक्षण घेतल्यानंतर थेट गावागावात जावून तिथले प्रश्‍न समजून घेण्याचं आजच्या परिस्थितीत ‘वेड’ म्हणावं असं वेडच बाळा बांगर यांना लागलं असं म्हणायलाही हरकत नाही. कुटुंबाचा वारसा असला तरी त्या पलीकडे जावून स्वत:चं म्हणून काही अस्तित्व निर्माण करायचं यासाठी मागच्या पाच सहा वर्षात हा तरुण पायाला भिंगरी लावून फिरतोय. मध्यतरीच्या काळात आलेल्या कोरोनाच्या महामारीनं भल्या भल्यांच्या वाहनांची चाक थांबविली. अनेक पुढार्‍यांच्या गाडीच्या काचा खाली येत नव्हत्या. त्या काळात बाळा बांगर यांच्या गाडीने मात्र मोठा वेग घेतला. आणि त्यांच्या स्वत:च्या वाहनाला अगदी रुग्णवाहिकेचं स्वरुप आलं. कोरोनाने ग्रस्त रुग्णांना स्वत:च्या गाडीतून, स्वत:च वाहन चालवत रुग्णालयात पोहचवण्याचं धाडस त्यावेळी खरचं विचार करण्यापलिकडे होतं. त्याचा प्रसाद म्हणून कुटुंबातल्या अनेकांना संसर्गालाही सामोरं जावं लागलं. पण यामुळे ना बाळा बांगर बाधले ना त्यांचं काम थांबलं.
हे काम कदाचित एक दोन तालुक्यापुरतंच असेलही. पण या कामातून पहायला मिळाली ती बाळा बांगर यांची जिद्द, त्यांच्यातील धडाडी, सामाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि राजकीय कुटुंबातला असतानाही जपलेलं एक वेगळेपण. आज कदाचीत त्या गुणांना राष्ट्रवादी काँग्रेसचे न्याय दिला असावा.

 

Advertisement

Advertisement