Advertisement

पाच तालुक्यातील पदवीधरांचा बीडमध्ये मेळावा

प्रजापत्र | Monday, 23/11/2020
बातमी शेअर करा

पंकजा मुंडे करणार मार्गदर्शन

बीड : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेत्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरविणाऱ्या माजी मंत्री पंकजा मंत्री पंकजा मुंडे आता बोराळकर यांच्या प्रचारात उतरणार आहेत. माजी मंत्री पंकजा मुंडे उद्या  (दि. २४ ) बीडमध्ये ५ तालुक्यातील पदवीधरांचा मेळावा घेणार आहेत.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणूक आता रंजक होत आहे. भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिल्याने रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली आहे. तर भाजपचे अनेक पदाधिकारी आजही रमेश पोकळे यांच्यासोबत फिरत आहेत. शिरीष बोराळकर यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या, तेव्हापासून त्या अजूनही बीड जिल्ह्यात प्रचाराला आलेल्या नाहीत. बोराळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी बीड जिल्ह्यात दौरा केला. मात्र या दोन्ही वेळी पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नाहीत.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी  पंकजा मुंडे शिरीष बोराळकर यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये पदवीधरांचा मेळावा घेणार आहेत.आष्टी, पाटोदा , शिरूर , गेवराई आणि बीड तालुक्यातील पदवीधरांशी बीडमध्ये संवाद साधणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे अवघं भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

पंकजांच्या मार्गदर्शनाकडे लक्ष
दरम्यान औरंगाबाद येथे बोलताना माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी 'मी बोराळकर यांच्यासाठी एकाचे तिकीट कापून आले आहे ' असे म्हणाल्या होत्या, तसेच उपस्थितांना 'तुम्हाला रागवायचे असेल तर माझ्यावर नको, उमेदवारावर रागवा ' असेही त्यांनी म्हटले होते. त्यांनी दाखवलेल्या या मार्गाची औरंगाबादेत चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे बीडमध्ये काय 'मार्ग'दर्शन करतात याकडे पदवीधरांचे लक्ष आहे.

 

Advertisement

Advertisement