Advertisement

मुंडे क्षीरसागरांमध्ये नेमके कोणते 'नियोजन '?

प्रजापत्र | Tuesday, 31/01/2023
बातमी शेअर करा

बीड दि. ३० (प्रतिनिधी ) : पंकजा मुंडे आणि जयदत्त व भारतभूषण क्षीरसागर बंधू , यांच्यातील राजकीय संबंध हा क्षीरसागर आणि मुंडे दोघांच्याही कार्यकर्त्यांसाठी कायम चर्चेचा, काहीसा एकमेकांबद्दलच्या अविश्वासाचा विषय असतो. त्यातच जयदत्त क्षीरसागरांची मागच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेली जवळीक, पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी असतानाच, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतभूषण क्षीरसागर आणि पंकजा मुंडे एकमेकांना भेटले आणि त्यानंतर भारतभूषण क्षीरसागर यांनी सोशलमिडीयावर तो फोटो 'मतदानाची आकडेवारी आणि पुढील नियोजनाची चर्चा करताना ' असा उल्लेख करीत टाकला. त्यामुळे आता क्षीरसागर मुंडेंमध्ये पुढले 'नियोजन ' नेमके कोणते होणार आहे याचेच वेध दोघांच्याही कार्यकर्त्यांना लागले आहेत.

बीडच्या राजकारणावर प्रदीर्घकाळ सत्ता गाजविलेल्या दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि दिवंगत केशरकाकू यांचे राजकीय वारसदार असलेले अनुक्रमे पंकजा मुंडे आणि जयदत्त व भारतभूषण हे क्षीरसागर बंधू यांच्यातील राजकीय रस्सीखेच जिल्ह्यात चर्चेचा विषय राहिलेली आहे. बीड विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंडे क्षीरसागरांमधील दुरावा चर्चेत आला होताच. नंतरच्या काळात जिल्हा बँकेच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी 'मनातले' सारे सल एकमेकांना बोलूनही दाखविले होते. मात्र त्यानंतरही मुंडे क्षीरसागर एकत्र एकाच पक्षात येणार का यावरून दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये कायम संभ्रमाची भावना असते.

त्यातच मागच्या काही काळात भाजपमध्ये पंकजा मुंडे काहीशा बाजूला पडत असल्याचे चित्र असतानाच जयदत्त क्षीरसागर यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक अधिकच वाढली आहे. जयदत्त क्षीरसागर सध्या कोणत्याच पक्षात नाहीत, ते शिंदेंच्या जवळचे मानले जातात, मात्र आपली पक्षीय भूमिका अजूनही क्षीरसागरांनी गुलदस्त्यातच ठेवली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी मात्र त्यांनी थेट भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे आता जयदत्त क्षीरसागर कोणती वाट चोखाळणार यासंदर्भाने चर्चांचे पेव फुले आहेत.

अशातच सोमवारी शिक्षक मतदारसंघचे मतदान सुरु असताना भारतभूषण क्षीरसागर आणि पंकजा मुंडे यांची समोरासमोर भेट झाली. आता दोघेही एकाच व्यक्तीला कुमक करीत असल्याने त्यांच्यात नमस्कारांची देवाणघेवाण देखील झाली. मनात नसताना अगदी देवेंद्र फडणवीसांना देखील स्वतःच्या जिल्ह्यात नमस्कार न करणाऱ्या पंकजांनी भारतभूषण क्षीरसागर यांना नमस्कार केला आणि तो फोटो भारतभूषण क्षीरसागर यांनी स्वतःच्या फेसबुकवर शेअर केला. त्यासोबत 'मतदानाची आकडेवारी आणि पुढील नियोजनाची चर्चा ' अशा ओळी देखील टाकल्या. त्यामुळे आता क्क्षीरसागर मुंडेंचे पुढील 'नियोजन ' असणार तरी काय हाच दोघांच्याही कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे.

Advertisement

Advertisement