Advertisement

चिरंतन गांधी

प्रजापत्र | Monday, 30/01/2023
बातमी शेअर करा

या देशातील फॅसिस्ट शक्तींनी मोहन करमचंद गांधी हे नाव धारण करणाऱ्या शरीराला संपवून आज ७४ वर्ष झाली. आजही त्या व्यक्तीबद्दल बदनामीची मोहीम कांही लोक चालवितच असतात. त्या व्यक्तीला ज्याने संपविले त्याचे उदात्तीकरण करण्याचा देखील प्रयत्न होतो, याचे कारण म्हणजे मृत्युच्या ७४ वर्षानंतर देखील त्या महात्म्याचे विचार फॅसिस्ट शक्तींचा पिच्छा सोडू शकत नाहीत. आपल्या देशात त्या महात्म्याच्या बदनामीचे कितीही प्रयत्न केले, तरी आंतरराष्ट्रीय मंचावर आजही भारताची ओळख 'गांधींचा देश' अशीच द्यावी लागते. मृत्युच्या ७४ वर्षांनंतरही जगावर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांच्या प्रभावळीतले गांधींचे स्थान अबाधित राहते, हीच गांधी विचारांची शक्ती आहे, म्हणूनच गांधी चिरंतन आहेत.

 

खंडप्राय असणाऱ्या भारताला सर्वात प्रथम जर 'एक राष्ट्र, एक जनता' या सूत्रात बांधण्याचा प्रयत्न कोणी केला असेल आणि कोणाचा प्रयत्न जर यशस्वी झाला असेल, तर ती व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. मोहन करमचंद गांधी, हे नाव धारण करणारा गुजराती हा व्यापारी कुटुंबातला, वकिलीचे शिक्षण घेतलेला आणि दक्षिण आफ्रिकेत आपला 'करिष्मा ' दाखवून आलेला हा तरुण ज्यावेळी भारतात परतला, त्यावेळी इंग्रजांच्या अंमलाखाली असलेला भारत काही 'असेतुहिमाचल' एक राष्ट्र या भावनेत बांधलेला नव्हता. कोणी कितीही नाकारले तरी ते एक कटू वास्तव आहे. वेगवेगळ्या प्रांतीय, भाषिक, सांस्कृतिक अस्मिता असणाऱ्या या भूभागाला एका राष्ट्रीय धाग्यात बांधण्यासाठी पुढाकार घेतला तो गांधींनी. देशभर दौरा करून गांधींनी येथील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती अभ्यासली आणि त्यातूनच मग एका चळवळीला बळ मिळाले. तोपर्यंत काँग्रेस देखील काही देशभर पसरलेली चळवळ नव्हती आणि या चळवळीत सारेच समाजघटक जोडले गेलेले देखील नव्हते. खऱ्याअर्थाने देशातील सर्व समाजघटकांना राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून गांधींनीच जोडले. आणि येथूनच मग फॅसिस्ट शक्तींना गांधींची भीती वाटायला लागली. हा माणूस जातीय, धर्मीय , प्रांतीय अस्मितांना मूठमाती देणार हे त्यावेळी देखील फॅसिस्टांनी जाणले होते, म्हणूनच गांधींना संपविण्याचे अनेक प्रयत्न झाले.

गांधींची 'अहिंसा' ही सामान्यातल्या सामन्यांमध्ये आपण बलाढ्य शक्तीविरोधात उभे राहू शकतो हा विश्वास देणारी होती. त्यांचा चरखा हे श्रम प्रतिष्ठेचे प्रतिक होते, त्यांनी देशातील पहिला सत्याग्रह घडवून आणला तो शेतकऱ्यांचा, चंपारण्य सत्याग्रह, अस्पृश्यता निर्मुलनाला त्यांनी मोहीम म्हणून हाती घेतले. त्यांच्यावर संतांच्या विचारांचा देखील तितकाच प्रभाव होता, म्हणूनच त्यांनी ज्या काही अभंगांचे अनुवाद केले, त्यात तुकोबांच्या 'जे का रंजले गांजले ' या अभंगाचा समावेश आहे. त्यांनी महिलांना प्रथमच राष्ट्रीय मंचावर मोकळेपणाने येता येईल असे वातावरण निर्माण केले. खिलाफत चळवळीला आपलेसे करून त्यांनी मुस्लिम समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणले. थोडक्यात एकूणच जे जे म्हणून समाजघटक आहेत, त्या सर्वांना एकत्र करणारी शक्ती म्हणून गांधी उदयास आले. म्हणूनच या शक्तीचा त्रास ज्यांना केवळ विघटनाची राजनीती करायची आहे, त्यांना होणारच. त्यांनी मग हा विचार संपविता येत नाही, या विचारला रोखता येत नाही, म्हणून या व्यक्तीला संपविण्याचा निर्णय घेतला आणि त्या व्यक्तीच्या देहाला संपविले. मात्र तेच गांधी आजही भारतातीलच नव्हे तर जगातील फॅसिस्टांना आपल्या विचाराने पुरून उरले आहेत.

देशातील ८० पेक्षा अधिक देशांनी गांधींची टपाल तिकिटे काढली आहेत, यात ज्या ब्रिटीश सत्तेविरोधात गांधींनी खऱ्या अर्थाने लढा उभारला, त्या ब्रिटनचा देखील समावेश आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने गांधींवर तिकीट काढले. जगातील अनेक देशातून आजही गांधींवर संशोधन सुरु आहेच. इतका हा विचार सार्वकालिक आहे. गांधी आजही सामान्यांच्या जगण्याचे सूत्र आहे. अंत्योदयातून सर्वोदय हा शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी दिलेला विचार असेल, किंवा शिक्षण पद्धतीमधील क्रांतिकारी अशी 'नयी तालीम' असेल, आजही गांधींचे हेच विचार राष्ट्रासाठी महत्वाचे आहेत.

दक्षिण आफ्रिकेत बलाढ्य शक्तीविरोधात दिलेला लढा असेल किंवा भारतात उभारलेला त्याहीपेक्षा मोठा लढा, 'निर्भय बनो' हेच गांधींच्या जीवनाचे सूत्र होते आणि आजही, ज्या-ज्या वेळी देशात राजकीय बदल घडले, त्या-त्या वेळी याच सूत्रावरून घडले. उद्याच्या पिढयांना देखील गांधींचा हाच विचार प्रेरणादायी ठरणार आहे. एका निशस्त्र म्हाता-याने, स्वतः कृश असतानाही, अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभे कसे राहायचे असते हे जे दाखवून दिले, तीच शक्ती आजही अनेक पिढ्यांना अन्यायाच्या, अत्याचाराच्या, एकाधिकारशाहीच्या विरोधात उभे राहण्याचे बळ देते.

गांधींची राजकीय चळवळ आणि राजकीय कार्यक्रम यासंदर्भातील भूमिका देखील स्पष्ट होती. विधायक कार्यक्रमावाचून कायदेभंगाचा लढा चालविणे हे पक्षाघात झालेल्या हाताने चमचा उचलण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे असे गांधीजी म्हणायचे. तसेच ज्या संघर्षात नंतर रचना करण्याची कुवत नसते, तो संघर्ष नपुंसक असतो. ज्या रचनात्मक कार्यक्रमात सर्व प्रकारच्या गुलामगिरीविरोधात किंवा अन्य, कुशासन , भ्रष्टाचार याविरुद्ध संघर्ष करण्याची शक्ती नसते तो कार्यक्रम देखील कुचकामी असतो' हा विचार गांधींनी दिलेला आहे. आज सारे विरोधक एकत्र येऊन देखील मोदींच्या एकाधिकारशालीला हटवू का शकले नाहीत, याचे उत्तर देण्याची, म्हणजे काळाच्या ७० वर्ष पुढे पाहण्याची क्षमता गांधींच्या विचारात होती. व्यवस्था परिवर्तन, सत्तापरिवर्तन करायचे असेल तर कसे करायचे असते याचे सूत्र गांधींनी घालून दिलेले आहे, आणि म्हणूनच गांधी कोणत्याच एकाधिकारशहाला , एकचालकानुवर्तीत्वाने चालणाऱ्या विचारधारेला गांधी पचत  नसतात. मात्र महात्मा म्हणजे केवळ एक शरीर नाही,  तर चिरंतन टिकणारे , सार्वकालिक विचार म्हणजे महात्मा आहे, आणि विचार कोणालाच संपविता येत नसतात. ते चिरंतन आहेत, आणि म्हणूनच महात्मा गांधी देखील या देशाचे चिरंतन सत्य आहे.

Advertisement

Advertisement