बीड : मोठा गाजावाजा करुन बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरु केलेल्या एटीएम सेवेला घरघर लागली आहे. मागच्या चार दिवसांपासून जिल्हाभरातील डिसीसी बँकेच्या खातेदारांचे एटीएम बंद पडले आहेत. या एटीएमवरुन व्यवहार होऊ शकत नसल्याने शेतकर्यांचे सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. बँकेने एटीएमवरील व्यवहार बंद केले असल्याचे काही अधिकारी खाजगीत सांगत आहेत. बँकेच्या सुत्रांनी मात्र हा प्रकार तांत्रिक बिघाडाचा असल्याचे म्हटले आहे.
प्रशासकाच्या अंमलाखाली असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काही काळापूर्वी बँकेचे सारे व्यवहार एटीएमच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व खातेदारांना एटीएम कार्ड वाटप करण्यात आले असून रोकड काढण्यासाठी शाखेत येवूच नका असे देखील मधल्या काळात सांगण्यात आले होते.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात खातेदार शेतकरी आहेत. या शेतकर्यांना पीक कर्जाची मिळालेली रक्कम असेल किंवा विम्याची नुकसान भरपाई, शासनाचे येणारे अनुदान, पीएमकिसानचे अनुदान आदी सार्या गोष्टी जिल्हा बँकेच्या याच खात्यात जमा होतात. अनेकदा शेतकर्यांना पीकविक्रीतून मिळणारे धनादेशदेखील याच खात्यात जमा केलेले असतात. नरेगाच्या माध्यातून मिळणार्या मजुरीसाठीदेखील हेच खाते देण्यात आले आहे. आता मात्र या खात्यांचे एटीएम चालत नसल्याचे मागच्या चार दिवसात स्पष्ट झाले आहे.
कोणत्याही एटीएम केंद्रावरुन पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास ‘ट्रान्जेक्शन अबोर्र्टेड, कॉन्टॅक्ट युवर बँक’ असा मेसेज येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकर्यांचे एटीएमच्या माध्यमातून होणारे व्यवहार बंद पडलेले असून बँकांच्या शाखांमध्ये पुरेशी रोकड नसते त्यामुळे सारेच व्यवहार ठप्प पडल्याची परिस्थिती आहे. बॅँकेनेे आता एटीएम मोडीत काढण्याचा निर्णय घेतला असल्याचीही चर्चा खाजगीत सुरु आहे. मात्र याला अधिकृत पुष्ठी मिळालेली नाही.
हा तांत्रिक बिघाड
एटीएमच्या संदर्भाने जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तो तांत्रिक बिघाड आहे. या संदर्भात बँकेने संंबंधित सेवा पुरविणार्या कंपनीकडे तक्रार देखील नोंदविलेली आहे. येत्या चार पाच दिवसात हा बिघाड दुरुस्त होईल.
- रवी उबाळे, (व्यवस्थापक मुख्यालय डीसीसी बँक बीड)