बीड दि.२९ (प्रतिनिधी):- शहरातून वाहणार्या बिंदुसरा नदी पात्रात कचरा जुने कपडे घाण किंवा बांधकामाचे वेस्टेज मटेरियल टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.नगरपालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये असून यापुढे नदीपात्रात कचरा टाकल्यास संबंधित नागरिकांवर, दुकानदारांवर , हॉटेलवाल्यांवर व इतरांविरुद्ध कारवाई करण्याची तंबी प्रशासनाने दिली आहे. अशा प्रकारचे बोर्ड देखील जागोजाग लावण्यात आले आहेत.
बीड जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा आणि मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी शहरातील बिंदुसरा नदीपात्र स्वच्छ करण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत तीन वेळा स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. नगरपालिकेसह प्रशासनातील यंत्रणा सोबत घेऊन जिल्हाधिकारी शर्मा आणि सीओ अंधारे यांनी स्वतः भल्या पहाटे बिंदुसरा नदीपात्रातील गाळ, कचरा बाहेर काढला. बार्शी रोड कडील बिंदुसरा नदी पूल, जुना बाजार दगडी पूल, मोंढा रोड पूल या भागातील नदीपात्रातही स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. पहिल्या दोन मोहिमेत जवळपास एक हजार टन कचरा बाहेर काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. प्रशासनाने आता बिंदुसरा नदीपात्रात कचरा टाकणार्यांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. नगरपालिकेने तशा आशयाचे बोर्ड मोठा पूल, दगडी पूल, मोंढा रोड पूल अशा विविध ठिकाणी लावले आहेत. नदीपात्रात कचरा, जुने कपडे , घाण किंवा बांधकामाचे वेस्टेज मटेरियल, मलबा टाकल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा सूचना बोर्डावर लावण्यात आले आहेत. प्रशासनातील काही कर्मचारी स्वतःहून बिंदुसरा नदीपात्रात कचरा टाकणार्यावर लक्ष ठेवून असणार आहेत. त्यामुळे यापुढे कचरा टाकल्यास कारवाई होणार हे अटळ आहे. त्यामुळे नागरिकांनी, दुकानदारांनी कसल्याही प्रकारचा कचरा नदीपात्रात टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे.