खरं तर कलेच्या क्षेत्राकडे जातीच्या किंवा धर्माच्या चौकटीतून पहायलाच नको असते. मात्र संस्कृतीचा संबंध केवळ धर्माशीच जोडण्याची ज्यांना सवय लागली आहे आणि संस्कृती रक्षणाचा ठेका केवळ आपणच घेतला आहे या अविर्भावात वावरणार्या भक्त मंडळींनी ‘पठाण’ला जो विरोध केला होता त्यात हे सारेच तोंडघशी पडले आहेत. या देशातील मुठभर कट्टरतावादी-मग ते कोणत्याही जात किंवा धर्माचे असो- सोडले तर बहुतांश जनता ही सहिष्णु असते आणि तीला कोणताच विव्देष रूचत नाही हेच ‘पठाण’ प्रकरणावरून समोर आले आहे.
या देशातील स्वत:ला धर्माचे ठेकेदार म्हणविणार्या मुठभर लोकांनी पठाण चित्रपटाला जो विरोध केला होता त्या विरोधाला सामान्यांनी धुडकावल्याचे चित्र मागच्या तीन दिवसात देशभर पहायला मिळाले. खरे तर कला आणि संस्कृती ही कोणा एका धर्माची जहागिरी नसते आणि या क्षेत्रांकडे धर्माच्या चष्म्यातून पाहिले जाणे देखील घातक आहे. असे असलेतरी मागच्या काही काळात कोणत्याही गोष्टीला धार्मिक रंग देण्याचा जो प्रकार काही स्वयंघोषित धर्मरक्षक करत आहेत त्यामागे धर्मापेक्षाही एखाद्या पक्ष आणि संघटनेचा राजकीय अजेंडा चालविणे हाच एकमेव हेतू आहे. त्यातूनच मग कोणत्याही कलाकृतीला कुठला तरी रंग द्यायचा आणि ती कलाकृती बहिष्कृत करण्याची उठाठेव समाजातील काही लोकांनी चालविलेली आहे. बॉलीवूडच्या क्षेत्रात रोज उठून कशावरतरी बहिष्कार टाकण्याची जी टूम काही लोकांनी काढली होती त्याला पठाण प्रकरणातून सामान्यांनी सनसनीत चपराक दिली आहे.
जर पठाण चित्रपटाला येथील मूठभर लोकांनी विरोध केला नसता तर आज हा चित्रपट पाहण्यासाठी जी गर्दी झाली आहे ती गर्दी दिसली असती का? या बद्दल संशयच आहे. परंतु समाजातील एक वर्ग या चित्रपटाला विरोध करत आहे म्हणून दुसर्या वर्गाने तितक्याच ताकदीने, किंबहुना काहीशा अधिक शक्तीने हा चित्रपट उचलून धरला. कट्टरता वाद मग तो कोणाचाही असो तो चुकीचाच असतो. त्यामुळे ‘पठाण’च्या बाबतीत सुरूवातीला जी कट्टरता मूठभर संस्कृती रक्षकांनी दाखविली त्याची प्रतिक्रिया ‘पठाण’च्या गर्दीतून उमटली होती. अनेक ठिकाणी कोणीतरी एकाने पुढाकार घेऊन चित्रपटगृह बुक केले आणि इतरांना मोफत सिनेमा दाखविला हाही प्रकार कला क्षेत्रासाठी फार भूषणावह म्हणावा असे नक्कीच नाही. हे सारे देखील कट्टरतेकडेच वळणारे. मात्र यासाठी कारण ठरले ते सुरूवातीला या चित्रपटाला झालेला विरोध. म्हणूनच कलेसारख्या क्षेत्रातही किमान जातीय आणि धार्मिक दृष्टीकोन ठेवला जाऊ नये. तसे करता आले नाही तर मग तोंडावर आपटण्याची वेळ येते.
मागच्या काही वर्षात सातत्याने सामान्यांच्या अभिव्यक्तीची गळचेपी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, आम्हाला आवडलं नाही म्हणजे लगेच ते त्याज्यच ठरले पाहिजे ही जी हुकुमशाही, ‘एकचालकानुवर्ती’ मानसिकता वाढीस लागली आहे त्यातूनच मग अमूक चित्रपटावर बहिष्कार टाका, तमूक नाटक चालू द्यायचं नाही, अमूक पुस्तकावर बंदी घाला असले आचरट प्रयोग या देशात केले जात आहेत. काही मूठभर लोकांकडून हे सारे सुरू असले तरी सामान्य जनता असली ‘थेरं’ खपवून घेत नाही. कला आणि संस्कृती साहित्य हे सामान्यांना जातीधर्माच्या पलिकडे जाऊन अनुभवायचे असते आणि यासाठी कोणी कितीही बंधने घातली तरी आज ना उद्या जनता ती बंधने झुगारते. विव्देषाच्या जंतूंना जनताच चिरडते हेच या माध्यमातून समोर आले आहे