Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - नागडेपणाचेच आहे 'भूषण'

प्रजापत्र | Monday, 23/01/2023
बातमी शेअर करा

कपडे घालणा-या समाजात राजा नागडा आहे म्हणून सांगितले तर राजा खजिल होतो आणि राजाचं नागडेपण सांगणे प्रबोधन ठरतं, पण नागडेपणा हेच जेंव्हा राजाला स्वत:साठी कौतुकास्पद वाटते तेंव्हा राजा नागडा आहे हे सांगण्यात कांहीच अर्थ नसतो. तशीच काहीशी अवस्था सध्या देशाची झाली आहे. पूर्वी ज्यावेळी सत्तेतील एखाद्या मंत्र्याविरुद्ध किंवा कोणत्याही पदावरील व्यक्तीविरुद्ध आरोप व्हायचे, त्यावेळी त्यांचे राजीनामे घेतले जायचे, नैतिकतेच्या आधारावर ती कृती केली जायची, मात्र आता सत्तेतल्यांना कोणती चाडच राहिलेली नसून कलंकितपणालाच आ'भूषण' म्हणून मिरविण्याचे दिवस असल्याने कोणावर कारवाईची शक्यताच नाही.

 

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. ब्रिजभूषण यांच्याबद्दलच्या तक्रारी वाढल्यानंतरही त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. यासंदर्भाने एकंदरच केंद्र सरकारने पाळलेले मौन पाहता आणि ब्रिजभूषणची एकंदरच मस्ती पाहता, मोदी सरकारमध्ये त्याला हात लावण्याची हिम्मत नाही हेच स्पष्ट आहे. ब्रिजभूषण चार वेळा खासदार असून आता त्याच्यावर कुस्तीसाठी आलेल्या महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. बरे हा आरोप करणारे कोणी राजकारणी नाहीत, तर ज्यांनी ऑलिम्पिक असेल किंवा राष्ट्रकुल, अशा स्पर्धांमधून देशासाठी खेळ खेळला, देशाला पदके मिळवून दिली, मोदींच्या 'अमृत काळा' मध्येच हे घडू शकते असे म्हणत भक्तांनी गौरव केला, त्या खेळाडूंनी केलेले हे आरोप आहेत. या खेळाडूंनी ऑलिम्पिक महासमितीच्या अध्यक्ष असलेल्या पी टी उषा यांच्याकडे देखील याची तक्रार केलेली आहे. कुस्तीपटूंना असली काही तक्रार घेऊन आंदोलन करण्याची वेळ यावी यावरुनच देशात नैतिकतेचा काय 'खेळ' झाला आहे हे स्पष्ट व्हावे. ब्रिजभूषणवर आरोप झाले आहेत, म्हणजे तो लगेच गुन्हेगार आहे असे आम्हाला म्हणायचे नाही. मात्र ज्यावेळी भाजप सत्तेत नव्हता, त्यावेळी हेच भाजपवाले केवळ आरोपावरुन सत्तेतल्यांचे राजीनामे मागत आले होतेच. फार लांबचे कशाला, ज्यांची संभावना भाजपवाले 'मौनी ' पंतप्रधान म्हणून करतात, त्याच मनमोहनसिंगांच्या काळातच काँग्रेसने अनेकांचे राजीनामे केवळ आरोप झाले म्हणून घेतले होते. शिवराज पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला केवळ मुंबई हल्ल्यानंतर वारंवार कपडे बदलले म्हणून आरोप होता. तर संपुआ सरकारमधील दूरसंचार मंत्री असलेल्या डी राजा यांना देखील टू जी मध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून आरोप होता, त्यांनी तात्काळ राजीनामे दिले. राजा नंतर या आरोपांमधून निर्दोष मुक्त देखील झाले, अशी उदाहरणे काँग्रेसच्या काळात अनेक आहेत. अगदी रेल्वे मंत्र्यांच्या नातलगांवर आरोप झाले म्हणून त्यावेळी रेल्वे मंत्र्यांना घरी जावे लागले होते. राजकारणात नैतिकता काँग्रेस दाखवित आली होती. काँग्रेसचं कशाला, जुना भाजप देखील असे मानदंड घालून देणारा ठरला होताच . हवाला प्रकरणात डायरीमध्ये नाव आले म्हणून राजीनामा देणारे लालकृष्ण अडवाणी विसरता कसे येतील? मात्र आजच्या सत्तेचे स्वरूप काय आहे? केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या चिरंजीवावर खुनाचा गुन्हा दाखल होतो, त्या प्रकारात त्याला वाचविण्यासाठी मंत्री महोदय सक्रिय असल्याचे समोर येते, मात्र ते अजूनही मंत्रिपदाची खुर्ची उबवित असतात. जय शहाची संपत्ती वाढते, त्याच्यावर आरोप होतात, मात्र अमित शहांना हात लावण्याची कोणाची हिम्मत होत नाही, अशी कितीतरी उदाहरणे मागच्या काही वर्षातील, विशेषतः मोदींच्या 'अमृत काळातील' देता येतील. महाराष्ट्रातही गेल्या मविआ सरकारच्या काळात मंत्री संजय राठोड यांचा पूजा वाघ मृत्यु प्रकरणात भाजपने आरोप करीत राजीनामा द्यायला भाग पाडले आणि भाजप त्यांच्यासमवेत सत्तेत येताच त्यांना मंत्री केले. त्यामुळे नैतिकतेचा अभाव असल्याने जिथे मोठमोठ्या मंत्र्यांचेच काही होत नाही, तिथे ब्रिजभूषण सारख्या खासदारांवर काही खेळाडूंनी आरोप केले तर त्यात काय एव्हढे, अशीच मानसिकता केंद्र सरकारची झाली आहे. एकदा का आरोप आणि कलंक आभूषणासारखे मिरवायचे ठरविले की मग असले कितीही ब्रिजभूषण सहज सत्तापदे उपभोगत राहतात. एकदा का सत्तेतल्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीलाच याचे काही वाटेनासे झाले, की मग इतरांचे काय? राजालाच नागडेपणाचे वावडे नसेल तर प्रजा आणि त्याचे सरदार नंगानाच करणारच ना? तसे काहीसे आता राजकारणासोबतच खेळाच्या बाबतीतही होऊ लागले आहे.

Advertisement

Advertisement