Advertisement

पोलिसांच्या त्रासामुळे तरुणाची आत्म्हत्या

प्रजापत्र | Sunday, 22/01/2023
बातमी शेअर करा

बीड - गुन्हे दाखल असलेल्या तरुणाच्या घरावर पोलिसांनी नोटीस चिटकवल्यानंतर 27 वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी तरुणाच्या मृत्यूस पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत जोपर्यंत दोषी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही या भूमिकेतून नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडला. या वेळी डीवायएसपी स्वप्नील राठोड यांनी संतप्त नातेवाईकांसमोर येत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या वेळी राठोड आणि नातेवाईकांत तुंबळ तुतु मै मै झाली. राठोड यांनी एकेरी भाषेत नातेवाईकांना सुनावलेही मात्र नातेवाईक अधिक संतप्त होत असल्याचे पाहून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन डीवायएसपी राठोड यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यास होकार दिला. दुपारपर्यंत मृतदेह रुग्णालयात पडून होता आणि नातेवाईक पोलिसांविरोधात तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात डेरेदाखल झाले होते.

आनंद शिरू भोसले (वय 27, रा. संजयनगर, गेवराई) याच्या विरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस पोलिसांनी त्याच्या घरावर डकवली होती. या नोटीशीवरून आनंद भोसले याने विषारी औषध प्राशन केले होते. त्यास बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूला पोलीस जबाबदार असून पोलीस आनंद भोसले याच्याकडे पैशाची मागणी करत असल्याचा आरोप मयत तरुणीच्या बहिणीने केला. जोपर्यंत दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल केला जात नाही तापेर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेत आनंदच्या कुटुंबियाने जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडला. या वेळी गेवराईचे डीवायएसपी राठोड हे घटनास्थळी गेले. उपस्थित नातेवाईकांना समजावून सांगण्याचे प्रयत्न केले मात्र नातेवाईकांनी पोलिसांना आरोपाच्या पिंजर्‍यात उभे करत पोलिसांनी 20 हजार रुपये मागितल्याचा अरोपही केला. तेव्हा राठोड आणि नातेवाईकांत प्रचंड तूतू मैमै झाली. राठोड यांनी एकेरी भाषेत उपस्थित नातेवाईकांना बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळेसही नातेवाईक शांत होत नसल्याचे पाहून आणि त्यांची आक्रमक भूमिका पाहून शेवटी राठोड यांनी दोषींविरोधात कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले. तेव्हा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे सांगितले. तत्पूर्वी नातेवाईक हे फिर्याद देण्यासाठी बीड शहर पोलिस ठाण्यात गेले, दुपारपर्यंत आनंदचा मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात होता.

 

गेवराई पोलिसात दाखल गुन्ह्यात फरार असलेला आरोपी आनंद भोसले याच्या घरावर नोटीस डकवण्यासाठी आमचे पोलीस त्या ठिकाणी गेले होते. पोलिसांनी रितसर घरावर नोटीस डकवल्यानंतर घरी पोलीस का आले? म्हणून कुटुंबियाचा वाद झाला आणि भोसले याने विष घेतले. यात पोलीस कर्मचारी जबाबदार असतील तर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

-स्वप्नील राठोड,

डीवायएसपी गेवराई

Advertisement

Advertisement