Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - दुहेरी चारित्र्याचा भाजप

प्रजापत्र | Thursday, 19/01/2023
बातमी शेअर करा

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अखेर एकदाची पार पडली. पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यकारिणीत 'कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह बोलू नका, अल्पसंख्याक समुदायामध्ये जा' असे जाहीरपणे सांगितले. हे भाजपचे दाखवायचे दात आहेत. मुळात अल्पसंख्यांक समुदायाबद्दल देशभरात जो टोकाचा विखार पसरवला गेला, तो याच मोदींच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीपासून. ज्या गुजरातला भाजपवाले मोठ्या अभिमानाने हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणत असतात, त्या प्रयोगशाळेतल्या 'रसायनाने' केलेली ही भाषा आणि दुसरीकडे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री फडणवीस अगदी शासकीय कार्यक्रमातही 'सनातन धर्म की जय' च्या देत असलेल्या घोषणा ही दोन्ही रुपे भाजपचीच आहेत. या लोकांचे राजकीय चारित्र्यच मुळात दुहेरी आहे. 

 

देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींना आजही भाजपेयी आणि भक्तगण हिंदुत्वाचे प्रतिक मानतात. हिंदु धर्माचा जर कोणी रक्षक असेल तर भक्तांच्या दृष्टीने ते रक्षक नरेंद्र मोदीच आहेत. ज्या गुजरातला भाजप अभिमानाने ' हिंदुत्वाची प्रयोगशाळा' म्हणते, त्या प्रयोगशाळेतील रसायने म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आता हे संयुग देशाच्या राजकारणात २०२४ च्या लोकसभा निवडणूकिवर लक्ष ठेवून आहे. त्यासाठीच भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत 'अल्पसंख्यांकामध्ये जा, त्यांनी मते दिली नाहित तरी हरकत नाही, पण त्यांना सरकारने राबविलेल्या योजना सांगा, अल्पसंख्याक समुहाबद्दल आक्षेपार्ह बोलू नका' असा अजेंडा मोदींनी दिला आहे. 

आता ज्या मोदींकडे त्यांची भक्तमंडळी अल्पसंख्यांकांचा जणू कर्दनकाळ म्हणून पाहत आली आहेत त्यांना मोदींचा हा नवा मंत्र पचविणे अवघड आहे. मात्र हा मंत्र देखील मोदींचा निवडणूकीचा चेहरा आहे. पंतप्रधान जर हे खरोखरच मनातून बोलणार असतील त्यांचे लाडके फडणवीस महाराष्ट्रात 'सनातन धर्म की जय' चा घोष घेऊन निघुच शकत नाहीत. मात्र कायम दुहेरी वागणे हाच भाजपचा स्वभाव आहे. महाराष्ट्रात आणि देशात अल्पसंख्यांकांबद्दल जर कोणी विखार पसरवला असेल तर तो उजव्या विचारधारेने,आणि याचे चेहरे कोण आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 

मुळात भाजपचे हिंदुत्व ही केवळ त्यांच्या राजकारणाची सोय आहे. यांनी सगळ्या महापुरुषांना देखील स्वत:च्या सोयीने वापरले. अगदी स्वामी विवेकानंदांसारख्या उदारमतवादी व्यक्तीला देखील भाजपवाल्यांनी एका धर्माचा रंग दिला. १८९८ साली 'जिथं वेद नसतील, कुराण नसेल, बायबल ही नसेल अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचे आहे. मात्र हे करण्यासाठी आपल्याला वेद, कुराण आणि बायबल मधील सुसंवादी स्वर छेडावे लागतील. आपल्याला मानवाला हे समजावून सांगावे लागेल की धर्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एकाच विश्वधर्माची अभिव्यक्ती मात्र आहे, आणि आपलं सर्वांचं एक असणं, हाच या अभिव्यक्तीचा एकमेव अर्थ आहे. तुम्हाला योग्य वाटणारी, झेपणारी कोणतीही वाट निवडा, तुमचं माणूस असणं त्यातून अभिव्यक्त होणार आहे' अशी भूमिका घेणाऱ्या विवेकानंदांना भाजपवाले कडव्या हिंदुत्वाचे आयडॉल ठरवित असतात, हा सारा प्रकार राजकारणातला टोकाचा निर्लज्जपणा आहे. पण हे भाजपला कायम अंगवळणी पडलेले आहे. 

मुळात भाजपवाल्यांचे नेत्यांचे वागणे आणि कार्यकत्यांकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा यात मोठा फरक असतो.भाजपचा कुठलाही नेता हवं तेंव्हा हवं त्यावेळी मुस्लिम व्यक्तीशी नेत्यांशी भेटतो. त्यांचे मुस्लिम लोकांशी व्यावसायिक आणि आर्थिक लागेबांधे असतात. ते मुस्लिम व्यक्तींशी व्यवहार करतात. एवढंच काय तर मुस्लिमांचे सिनेमे पाहू नका असे म्हणणारे भाजपच्या पक्षातील लोकांच्या गाण्याचे डायरेक्टर मुसलमान असतात. त्यांच्या रिल्स मध्ये मुसलमान असतात. एवढंच काय भाजप मधील बऱ्याच नेत्यांचे मुस्लिमांसोबत नाते संबंध आहेत.पण सामान्य हिंदूंनी मात्र मुसलमानांशी बोलू नये. सामान्य हिंदूंनी मुसलमानांचे सिनेमे पाहू नये, सामान्य हिंदूंनी मुसलमानांसोबत व्यवसाय, व्यवहार करू नये, आर्थिक हितसंबंध ठेऊ नये. नातेसंबंध निर्माण करायची तर गोष्ट लांबच तसा विचार जरी केला तरी आम्ही मोर्चे काढू असा पवित्रा ही विचारधारा घेत आली आहे. 

हे सगळं नक्की कशासाठी ? तर जनमत बनवण्यासाठी. मुस्लिमांचा द्वेष करून बनवलेलं जनमत. त्या जनमताच्या आधारावर सत्ता प्राप्त करायची आणि लोकांना वारंवार मूर्खात काढायचं. हा भाजपचा साधा नियम आहे.त्यामुळे मोदींचे कार्यकारिणीतले वक्तव्य त्या लोकांना मूर्खात काढण्याच्या उपक्रमाचाच एक भाग आहे. 

Advertisement

Advertisement