Advertisement

औरंगाबाद: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आणि राज्यभरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इयत्ता नववी ते बारावी शाळा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आता सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. मुंबई-ठाण्यापाठोपाठ औरंगाबाद शहर आणि पुणे जिल्ह्यात शाळा बंदच राहणार आहेत. औरंगाबाद शहरात थेट ३ जानेवारीपर्यंत शाळा बंद राहणार असून पुणे येथे १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्याबाबत रविवारी निर्णय घेण्यात येणार आहे.
                    २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावी हे वर्ग सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर चाेहाेबाजूने टीकेची झाेड उठली आहे. कोराेनाची दुसरी लाट येण्याची भीती असून दिवाळीनंतर वाढते रुग्ण बघता या चिंतेत भरही पडली आहे. अशा परिस्थितीत घाईघाईत शाळा सुरू करू नये असे मत पालक, शिक्षक, डाॅक्टरांपासून तर विविध क्षेत्रांतून उमटत आहे. राज्यभरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून विविध स्तरांवरील व्यासपीठावरून शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक तसेच शाळा संस्थाचालकांकडून एकसुरात शाळा सुरू करू नये असा रेटा लावला जात आहे.

Advertisement

Advertisement