मराठवाड्यातले एक सुसंस्कृत शहर म्हणून ओळख मिरविणाऱ्या अंबाजोगाई शहरात देखील सध्या शेकडो कोटींचा जीआरबी घोटाळा चर्चेत आहे. अर्थात अंबाजोगाई शहरात यापूर्वी देखील असे आर्थिक घोटाळे घडलेले आहेतच. आज देशाच्या सर्वच भागांमध्ये आर्थिक घोटाळ्यांची मालिकाच जणू सुरु आहे. मात्र 'अति' च्या हव्यासापायी अगदी सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणविणारे लोक देखील कसे लोभाला बळी पडतात हेच मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. सायबरच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष भेटीतून , झटपट श्रीमंत करण्याचे अमिष दाखवून होणारी फसवणूक सध्या चिंतेची बाब झाली आहे. यापासून सुटका केवळ कायद्याने होणार नाही, तर त्यासाठी मानसिकता देखील बदलावी लागणार आहे. संत तुकारामांनी सांगितलेला 'जोडूनिया धन उत्तम व्यवहारे 'चा मार्गच असल्या भामटेगिरीतून सुटका करू शकतो.
मागच्या काही दिवसांपासून अंबाजोगाई शहरात घडलेला जीआरबी घोटाळा चर्चेत आहे. यात एका व्यक्तीने अनेकांना तब्बल १०० कोटीपेक्षा अधिकचा गंडा घातला आहे. अशा अनेक घटना बीड जिल्ह्यात आणि राज्यात घडलेल्या आहेतच. यापूर्वी, म्हणजे तीन चार वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरात असाच एक घोटाळा समोर आला होता. बीड जिल्ह्यात महेश मोतेवारच्या 'समृद्ध जीवन'ने यापूर्वी अशीच अनेकांच्या संसाराची होळी केली आहे. ही काही प्रतिकात्मक नावे झाली, मात्र आजही रोज कोणतीतरी गुंतवणुकीची किंवा एमएलएम (साखळी मार्केटिंग ) ची मालिका समोर येतेच. भल्या मोठ्या परताव्याचे आमिष असेल किंवा मग झटक्यात करोडपती होण्याचे स्वप्न हे दाखवून असे आर्थिक गुन्हे घडत आहेत.
झटपट श्रीमंत करण्याचे किंवा फुकटच्या बक्षिसांचे आमिष दाखवून होणारे सायबर गुन्हे देखील मागच्या काही काळात वाढले आहेत. विशेष म्हणजे अशा गुन्ह्यांना बळी पडणारा वर्ग हा समजतील तसा पांढरपेशा म्हणावा असा आहे. शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर अशा वर्गाला देखील रोज कुठे ना कुठे गंडा घातला जातो . कधी बक्षीस लागले म्हणून, कधी कोणती तरी योजना मिळवून देतो म्हणून भामटे अशा लोकांना शोधत असतात .
मुळात मागच्या काही काळात, विशेषतः मागच्या दीड दोन दशकात , चंगळवादी संस्कृती हात पाय पसरू लागल्यानंतर पैशाचा जो काही हव्यास वाढला आहे, त्यातून मग भामटेगिरी करणाऱ्या लोकांना 'सावज ' शोधणे सोपे होऊ लागले आहे. पैसे कमविणे किंवा संपत्ती निर्माण करणे वाईट नाही. तो प्रत्येकाचा हक्क आहे. मात्र आपण जी संपत्ती मिळवितो, तिचा मार्ग काय असावा याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहे. संपत्ती कमविण्याच्या साधनांची शुद्धता शिकविणारी साधन शुचिता हा एकेकाळी आपल्या संस्कृतीचा भाग होता, मात्र आपण तो मार्गच विसरत चाललो आहोत.
इथे प्रत्येकाला झटपट श्रीमंत व्हायचे आहे. एखाद्याला काही मिळाले म्हणजे ते मला मिळालेच पाहिजे अशी जी मानसिकता सध्या मोजक्याप्रमाणावर वाढीस लागली आहे, त्यातूनच मग आर्थिक गुन्हे करणारांना आपल्या गुन्ह्यांसाठी ही भूमी पोषक वाटू लागली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहे, त्यांचे पैशामागे लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे. जिथे राष्ट्रीयकृत बँकांना ठेवीवर ८ % च्या पलीकडे व्याज द्यायला परवडत नाही, तेथे २० % पर्यंत व्याज देणे कसे शक्य आहे याचा साधा विचार देखील केला जात नाही, किंवा तसा विचार करावा असे वाटत नाही, इतकी 'इझी मनी ' ची मोहिनी आपल्या मानसिकतेवर पडली आहे, त्यातूनच असे प्रकार घडत आहेत. अशा गुन्ह्यांचा बिमोड करण्यासाठी कायदे आहेत, मात्र त्यात तितक्याच पळवाटा देखील आहेत, आणि यातून उद्या गुन्हेगाराला शिक्षा झाली, तरी गुंतवणूकदारांच्या पैशांचे काय ? ते तर परत मिळतच नाहीत . त्यामुळेच जगण्यासाठी राष्ट्रसंत तुकाराम महाराजांनी जो 'जोडूनिया धन उत्तम व्यवहारे' चा मंत्र दिला तोच आर्थिक गुन्ह्यांना पायबंद घालू शकतो. त्या मंत्राचा अंगीकार जोपर्यंत समाज करीत नाही, तो पर्यंत आर्थिक गुन्हे वाढतच जाणार .