Advertisement

बीडमध्ये 'जोशीमठ' होण्याची वाट पाहतेय का प्रशासन ?

प्रजापत्र | Saturday, 14/01/2023
बातमी शेअर करा

बीड दि. १३ (प्रतिनिधी ) : उत्तराखंडमध्ये पर्यावरणाशी खेळ करून सुरु असलेल्या बांधकामांमुळे 'जोशीमठ'  नावाचे अख्खे गाव आज विस्थापित करण्याची वेळ आली आहे. मात्र जे उत्तराखंडच्या जोशीमठात होत आहे तसेच देशाच्या अनेक भागात घडू शकते. अगदी बीड शहराच्या काही भागाला देखील उद्या जोशीमठाचे स्वरूप येऊ शकते . बिंदुसरा असेल किंवा कर्परा, या नद्यांच्या पूररेषेत उभारलेल्या इमारती, नदीमध्ये भराव घालून नदीपात्राचे केलेले मैदान आणि ओढे चक्क बुजवून किंवा त्यांचा प्रवाह वळवून झालेली बांधकामे याचा मोठा परिणाम पर्यावरणावर होत आहे. मात्र प्रश्नातले अधिकारी याकडे सोयीस्कर डोळेझाक करीत आहेत.
बीड शहरातून बिंदुसरा आणि कर्परा अशा दोन नद्या वाहतात, तसेच बीड शहरातून काही मोठे ओढे देखील वाहतात. बीड शहरात जसजसे जागेचे भाव वाढू लागले तसतशी भूमाफियांनी नजर अशा नदी आणि ओढ्यांवर गेली. प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून थेट नदी आणि ओढ्यांवर अतिक्रमण करण्याचा सपाटा मागच्या काही काळात भूमाफियांनी लावला आहे. बिंदुसरा नदीमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण करून, संरक्षक भिंतींद्वारे नदीचा प्रवाह वाळवून पूररेषेत टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. बिंदुसरा नदीमध्ये काही ठिकाणी भराव घालून चक्क नदीपात्राला मैदानाचे स्वरूप देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी दोन्ही बाजूनी भराव घालून नदीपात्राचा संकोच करण्यात आला आहे. कर्परा नदीची अवस्था देखील यापेक्षा वेगळी नाही. अशा ठिकाणी अतिक्रमण करून भूमाफियांनी त्या जागा नागरिकांना विकल्या आहेत, आणि त्यावर आता मोठ्याप्रमाणावर बांधकामे झाली आहेत.
शहरातून वाहणाऱ्या ओढ्यांची अवस्था तर यापेक्षा वाईट आहे. अनेक ठिकाणी ओढ्यांवर पक्की बांधकामे झाली आहेत. तर काही ठिकाणी ओढ्याला एखाद्या मोरीचे स्वरूप आले आहे.

 

शहरातील अनेक भागात घुसते पाणी

बीड शहरातून वाहणाऱ्या नदी आणि ओढ्यांचे प्रवाह अडविण्यात किंवा बदलण्यात आल्याने जर मोठा पाऊस आला तर नदीचे पाणी थेट शहरात घुसते. यापूर्वी अनेक वेळा ते पाहायला मिळाले आहे. यापूर्वी अगदी कृष्णमंदिर आणि थेट जालना रोड पर्यंत पाणी घुसले होते. पण प्रशासन याकडे डोळे उघडून बघायला तयार नाही.

 

आम्ही तक्रारी करतो, पण लक्षात कोण घेतो

बीड शहरातून वाहणाऱ्या नदी आणि ओढ्यांवरील अतिक्रमणाच्या अनेक तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या. त्यासाठी आम्हाला धमक्या देखील आल्या. खरेतर नदी, नाले यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र प्रशासन उलट आम्हालाच जाब विचारते आणि अडचणीत आणते.
रामनाथ खोड (सामाजिक कार्यकर्ते )

दुर्घटना घडल्यावरच होणार का जागे ?

बीड शहरातील नदी, नाले यावरील अतिक्रमणाबाबत मी अनेकदा निवेदन दिलेले आहे. मात्र प्रशासन लक्ष देत नाही. आता उत्तराखंडच्या 'जोशीमठात' काय होत आहे हे आपण पाहतोय. मग बीडमध्ये देखील काही दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही का ?
डॉ. गणेश ढवळे (सामाजिक कार्यकर्ते )

काय आहे जोशीमठ

उत्तराखंडमध्ये जोशीमठ हे एक गाव आहे. भुसभुशीत पायावर हे गाव उभारलेले आहे. येथे पर्यटन उद्योगाच्या नावाखाली मोठ्याप्रमाणावर बांधकामे झाली. आता हे सारे गावच खचले आहे. घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. साऱ्याच गावाचे पुनर्वसन करावे लागेल अशी भयानक परिस्थिती सध्या तेथे आहे.

Advertisement

Advertisement