Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - समाजवादी आवाज शांत

प्रजापत्र | Saturday, 14/01/2023
बातमी शेअर करा

आज सत्तेच्या पदासाठी अगदी सहज पक्षांतरे आणि विचित्र आघाड्या होत असतानाच्या काळात ज्या सत्तेपुढे लोटांगण घालण्यासाठी भले भले सहज तयार होतात, त्या सत्तेकडे पाठ फिरवून प्रसंगी स्वतःची खासदारकी गमाविलेल्या व्यक्ती राजकारणात फारशा नाहीत. शरद यादव हे त्यापैकी एक होते. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि मोदींचा भाजप यातील फरक ओळखणारा, राजकारणात सुरुवातीपासून समाजवाद आणि ओबीसीकेंद्री राजकारण रुजविणारा एक समाजवादी म्हणून शरद यादव यांची ओळख होती. हा आवाज आज शांत झाला आहे. राजकारणात अशा व्यक्तींची उणीव हे संसदीय राजकारणाचे आणि पर्यायाने समाजाचे मोठे नुकसान आहे. 

 

जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीने देशाला जे काही समाजवादी विचारांचे नेते दिले आणि ज्यांनी पुढे काही दशके देशाच्या राजकारणावर आपली छाप पाडली अशा नेत्यांपैकी शरद यादव एक होते. जयप्रकाश नारायण यांचा समाजवादी विचार रुजविताना देशातील ओबीसींना न्याय देण्याची जी भूमिका व्ही पी सिंग यांनी घेतली होती, त्या भूमिकेचे कट्टर समर्थक म्हणून देखील शरद यादव यांची ओळख होती. कर्पुरी ठाकूर, चौधरी चरणसिंग, अगदी राजीव गांधी यांच्यासारख्या नेत्यांसोबत शरद यादव यांनी काम केले. व्ही पी सिंग असतील किंवा अटलबिहारी वाजपेयी , यांच्या मंत्रिमंडळात तर ते मंत्री होते. समाजवादी विचार जपताना देखील राजकारणातील एकाधिकारशाहीच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळेच ज्यावेळी देशात काँग्रेसच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात भूमिका घेण्याची वेळ आली, त्यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रयोग आकाराला आणण्यात शरद यादव यांची भूमिका महत्वाची राहिली . शरद यादव यांच्यासारखे लोक वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होते म्हणूनच त्या सरकारला ऊग्र हिंदुत्ववादाच्या पुरस्कार करता आला नाही हे देखील लक्षात घ्यावे लागेलच. त्यामुळेच एकेकाळी वाजपेयींसोबत मंत्री राहणारे शरद यादव , मोदींसोबत मात्र राजकीय संसार करू शकले नाहीत नितीशकुमार ज्यावेळी मोदींकडे झुकले, त्यावेळी शरद यादव यांनी घेतलेली वेगळी भूमिका म्हणूनच राजकारणात महत्वाची ठरते. राजकारण केवळ सत्तेची खुर्ची उबविण्यासाठी नाही, आणि प्रसंगी, भूमिका घेण्याची वेळ आली तर ठोस भूमिका घ्यावी लागते आणि त्यासाठी किंमत देखील चुकवावी लागते हे जाणून असणाऱ्या शरद यादवांनी ज्यावेळी नितीशकुमार यांच्यासोबत मोदींकडे न जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांना खासदारकीवर देखील पाणी सोडावे लागले. मात्र त्यांनी त्याची तमा बाळगली नाही. आज सत्तेसाठी जी पक्षांतर होत आहेत, त्या काळात असे उदाहरण निश्चितपणे वेगळे आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत शरद यादव कायम ओबीसीकेंद्री राहिलेच, पण बिहार सारख्या राज्यात, जेथे उच्चवर्णीय समुहांचा प्रभाव आहे, आणि ज्यावेळी सरंजामदारी अधिक तीव्र होती, काँग्रेससारखा पक्ष ज्यावेळी अप्रत्यक्षपणे सरंजामदारीसोबतच होता, त्या काळात ओबीसीकेंद्री राजकारण करण्याची निश्चलता यादव यांनी दाखविली. लालूप्रसाद यादव असतील , किंवा नितीशकुमार, किंवा या दोन मोठ्या नावांपलीकडे जाऊन बिहारच्या राजकारणातील अनेक चेहरे, त्यांच्या राजकीय उभारणीत , किंबहुना अनेकांना राजकारणाचे अ ब क ड शिकविण्यात शरद यादव यांचा मोठा वाट होता, त्या अर्थाने ते अनेकांचे राजकीय गुरु होते. मंडलच्या प्रभावी अंमलबजावणीचे ते शिलेदार राहिले. म्हणूनच आज त्यांच्या जाण्याने राजकारणात एक पोकळी निर्माण झालेली आहेच. काही व्यक्तींचे केवळ असणे देखील राजकारण, समाजकारणात आशादायी असते. ओबीसी, सामान्यांनाच आवाज आणि तत्वनिष्ठ राजकारणी, उत्कृष्ठ संघटक आणि राजकीय आयुष्यात चारित्र्य टिकवून ठेवलेला व्यक्ती अशी ओळख असलेल्या शरद यादवांचे जाणे हे समाजाचे मोठे नुकसान आहे.

Advertisement

Advertisement