Advertisement

बीड दि.12 (प्रतिनिधी) : सामन्यांचे सोडाच, ज्या रस्त्यावरून रोज स्वतः जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसपी, खुद्द  आमदार, माजी मंत्री, माजी नगराध्यक्ष यांना देखील जावे लागते, ज्या रस्त्यावर महत्वाची शासकीय कार्यालये आहेत, त्या रस्त्यावर अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरात दोनशेपेक्षा अधिक खड्डे पडले असल्याचे चित्र आहे. या खड्ड्यांमुळे रोज अपघाताला निमंत्रण मिळत असताना त्याच्या दुरुस्तीसाठी काही करण्याऐवजी प्रशासन मात्र ’रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या’ फोटो सेशनमध्येच धन्यता मानीत आहे. बीडचा नगर रस्ता हे केवळ एक उदाहरण आहे, जिल्हाभरात खड्ड्यांमुळे अपघातप्रवण बनलेल्या रस्त्यांची संख्या मोठी आहे. मात्र त्यासाठी कोणतीच पाऊले उचलली जात नाहीत.
राज्यभर सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु आहे. राज्य सरकारने सांगितले म्हणून स्वतः जिल्हाधिकारी, आरटीओ आणि इतर सर्वच अधिकारी सध्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेत आहेत. त्या कार्यक्रमांमधून वाहतुकीचे नियम कसे पाळायचे याचे आवाहन केले जात आहे. असे सप्ताह व्हायला हरकत नाही, यातून वाहतुकीबाबत जागृती होत असेल तर ते चांगलेच. मात्र असे सप्ताह होत असतानाच अपघाताला प्रमुख कारण असलेल्या रस्त्यांच्या दर्जाचे काय हा प्रश्न आहे. उदाहरण म्हणूनच पाहायचे तर बीडचा नगर रस्ता. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते बालेपीर पर्यंत अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरातील या रस्त्याची अवस्था आज पहिली तर या अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरात रस्त्यावर दोनशेपेक्षा अधिक खड्डे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा न्यायालय , पंचायत समिती, वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे निवासस्थान याच रस्त्यावर , त्यामुळे येथील वर्दळ देखील मोठी . या अधिकारी, पदाधिकार्‍यांना देखील रोज याच रस्त्यावरून जावे लागते. मात्र रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी काहीच होत नाही.नाही म्हणायला अधून मधून या रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे कार्यक्रम पार पाडला जातो. यातून चार दोन गुत्तेदारांना काय तो फायदा होतो , मात्र चार दिवसातच पुन्हा परिस्थिती  जैसे थे. एक खड्डा भरला, की दुसरीकडे खड्डा पडतो अशी परिस्थिती. अशावेळी या सर्‍यावरून जायचे कसे हाच मोठा प्रश्न आहे. हा रस्ता सध्या अपघातांना निमंत्रण देणारा ठरला आहे. या महामार्गाचे काम नव्याने होणार आहे, मात्र कंत्राट घ्यायला कोणी तयार नाही. महामार्ग झाल्याने स्थानिक पातळीवर दुरुस्ती होत नाही, त्यामुळे नागरिकांनी सहन तरी किती करायचे असा प्रश्न आहेच. रस्ता सुरक्षा सप्ताहाचे फोटो सेशन करतानाच जबाबदार व्यक्तींनी जरा रस्त्याकडेही पाहावे अशी जनतेची मागणी आहे.

ब्लॅक स्पॉट शोधले, सुरक्षेचे काय ?

ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात असे ब्लॅक स्पॉट प्रशासनाने निश्चित केले आहेत. त्यासाठी उपाययोजना देखील सुचविल्या आहेत, मात्र त्याचे देखील पालन होत नाही. त्यामुळे असे ब्लॅकस्पॉट देखील अपघाताला निमंत्रण देत आहेत. 

 

अनेक रस्त्यांची अवस्था अशीच

बीड जिल्ह्यातील खड्ड्यांची संख्या जास्त असलेला नगर रोड हा एकमेव रस्ता नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी हीच परिस्थिती आहे. काही अपवाद वगळता सर्वच तालुका मुख्यालयाचे रस्ते असेच आहेत. शहरांमधील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे हा जिल्ह्यात सर्वत्र दिसणारा प्रश्न आहे. मात्र याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही..

Advertisement

Advertisement