Advertisement

विमा कंपनीने केलेल्या पंचनाम्याची कृषी विभाग करणार तपासणी

प्रजापत्र | Thursday, 12/01/2023
बातमी शेअर करा

बीड दि.11 (प्रतिनिधी) : खरीप  हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यभरात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र त्या तुलनेत विमा  कंपन्यांकडून पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकर्‍यांना वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि एकाच गावात देखील मिळालेल्या नुकसान भरपाईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तफावत आहे.यामुळे राज्यभरामध्ये शेतकर्‍यांचा संताप व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळे आता पिकविम्याच्या संदर्भाने प्रशासनाला जाग आली आहे . पीक विमा कंपनीने शेतकर्‍यांच्या केलेल्या पंचनाम्याची माहिती तातडीने  कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडे सादर करण्याचे निर्देश आता राज्याच्या कृषी  सह संचालकांनी विमा कंपन्यांना दिले आहेत.
खरीप हंगामात राज्याच्या अनेक भागात कोठे पावसाचा खंड  तर कोठे अतिवृष्टी असे प्रकार सातत्याने घडले होते . याचा मोठा फटका खरीप पिकांना पिकांना बसला . अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या निकषांखाली पंचनामे करण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. वीमा कंपन्यांनी याचे पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मात्र या नुकसान भरपाईमध्ये ठिकठिकाणी मोठी तफावत असल्याचे चित्र आहे. एकाच गावात शेतकर्‍यांना मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रक्मेमध्येही तफावत आहे. याबद्दल ठिकठिकाणी शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी तक्रारी देखील केल्या आहेत . बीड सारख्या जिल्ह्यात किसानसभा आणि इतरांनी आंदोलने सुरु केली आहेत.
या पार्श्वभूमीवर आता कृषी विभागाला जाग आली आहे.  सह संचालक विनय आवटे  यांनी राज्यातील सर्वच विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत. यात विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या केलेल्या व्यक्तिगत पंचनाम्याची माहिती तातडीने अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. या माहितीची छाननी कृषी विभागाचे अधिकारी करणार आहेत. येत्या 7 दिवसात सर्व विमा कंपन्यांनी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडे माहिती द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शेतकर्‍यांना अधिकची नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement